एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’साठी खडतर प्रवास; वृद्धांना बसावे लागते ताटकळत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 01:48 PM2019-08-11T13:48:17+5:302019-08-11T13:49:58+5:30
नोंदणीसाठी वृद्धांना पाच ते आठ तास बसस्थानकावर ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळांतर्गत प्रवास भाड्यात सवलत देण्यासाठी स्मार्ट कार्ड काढण्याची मोहीम सध्या राज्यभर सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील दीड हजार जेष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये १२ हजार ६४३ जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. नोंदणीसाठी वृद्धांना पाच ते आठ तास बसस्थानकावर ताटकळत बसावे लागत असल्याने एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी वृद्धांचा खडतर प्रवास सुरू असल्याचे चित्र आहे.
एसटीचा प्रवास कॅशलेस पद्धतीने करण्याची घोषणा १ जून रोजी करण्यात आली होती. त्यानुसार कॅशलेस प्रवासासाठी प्रवाशांना लागणाऱ्या स्मार्ट कार्डकरीता डेपोनिहाय नोंदणी करण्याचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू झाले आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. परंतू स्मार्ट कार्ड काढण्यासाठी यंत्रणा तोकडी पडत असल्याने बसस्थानकांवर जेष्ठ नागरिकांच्या रांगा कायम दिसून येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या सात आगारांतर्गत १४ हजार ७०९ स्मार्ट कार्डसाठी जेष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या १२ हजार ६४३ आहे. काही बसस्थानकावर तर सकाळी सात वाजेपासून जेष्ठ नागरिक स्मार्ट कार्डच्या नोंदणीसाठी रांगेत उभे राहत आहेत. काही बसस्थानकावर दुपारी दोन वाजेनंतर स्मार्ट कार्ड नोंदणीची प्रक्रिया सुरू होते. परंतू ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांना तोपर्यंत ताटकळत बसावे लागते. त्यामुळे सध्या अनेक जेष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डची नोंदणीच केली नाही. नोंदणी केल्यानंतर प्रत्येक रविवारी सकाळी ९ ते ५.३० वाजेपर्यंत कार्ड वाटप करण्यात येते.
आगार निहाय स्मार्ट कार्ड नोंदणी
बुलडाणा आगारामाध्ये एकूण २ हजार ९२९ स्मार्ट कार्ड नोंदणी झाली आहे. त्यामध्ये जेष्ठ नागरिक २४७७ व विद्यार्थी ४४९ आहेत. चिखली आगारात एकूण १ हजार ५८६ नोंदणी झाली आहे. त्यात जेष्ठ नागरिक १४६१ व विद्यार्थी १२५ आहेत. जळगाव जा. आरामध्ये एकूण १ हजार ८३३ नोंदणी झाली असून, जेष्ठ नागरिक १७९६ व विद्यार्थी ३७ आहेत. खामगाव एकूण १ हजार ७३३ असून, जेष्ठ नागरिक १७१८ व विद्यार्थी १५ आहेत. मेहकरमध्ये एकूण २ हजार १७३ नोंदणी झाली असून, जेष्ठ नागरिक १०१९ व विद्यार्थी १ हजार १५४ आहेत. मलकापूर एकूण ३ हजार ५२३ नोंदणी झाली असून, जेष्ठ नागरिक ३५२० व विद्यार्थी ३, शेगाव एकूण ९३४ नोंदणी झाली आहे. त्यापैकी जेष्ठ नागरिक ६५२ व विद्यार्थी २८३ आहेत.
दोन हजार विद्यार्थ्यांची नोंद
जेष्ठ नागरिकांबरोबच विद्यार्थ्यांनाही स्मार्ट कार्ड देण्यात येते. आतापर्यंत स्मार्ट कार्डसाठी जिल्ह्यात दोन हजार ६६ विद्यार्थ्यांनी नोंद केली. त्यात मलकापूर आगारामध्ये सर्वात कमी म्हणजे केवळ तीन विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक मेहकर आगारामध्ये ११५४ विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे.
जिल्ह्यात स्मार्ट कार्ड नोंदणीची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. सध्या दीड हजारापर्यंत नोंदणी पूर्ण झाली असून, जेष्ठ नागरिकांना याचा लाभ घ्यावा.
- ए. यू. कच्छवे,
विभागीय वाहतूक अधिकारी, बुलडाणा.