- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गंत स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत वऱ्हाडातील ५ हजार २८८ शाळा ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ मोहिमेत सहभागी होणार आहेत. १ ते १५ सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येणाºया स्वच्छ भारत पंधरवडयात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासाठी विद्यार्थी ‘स्वच्छतेचे राजदूत’ बनणार आहेत. या स्वच्छ भारत पंधरवड्याअंतर्गंत १ सप्टेंबर रोजी सर्व शाळा, शिक्षण संस्थेत विद्यार्थी स्वच्छतेची शपथ घेणार आहेत. पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यात शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ किंवा पालक व शिक्षकांमध्ये बैठक आयोजित करून मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये स्वच्छता आणि स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणे, शाळा व घरांमध्ये स्वच्छता व स्वच्छतेसाठी चांगल्या पध्दतीचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा, तालुका किंवा पंचायतस्तरावर स्वच्छ व सुव्यवस्थित परिसर व शौचालयांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी चित्रकला स्पर्धा, स्वच्छता विषयावर वादविवाद स्पर्धा, स्वच्छतेच्या जागरूकतेसाठी शाळा किंवा शैक्षणिक संस्थेच्या संकेतस्थळार संदेश किंवा स्वच्छतेचे छायाचित्र प्रसिध्द करणे, अनावश्यक कागदपत्रे काढून टाकणे, जुन्या फाईल्स दप्तरी दाखल करणे, शाळा परिसरातील टाकाऊ साहित्य काढून टाकणे, जवळच्या नागरीवस्तीत स्वच्दता पंधरवड्याचा प्रचार करणे, ओला-सुका कचरा वेगवेगळा गोळा करणेबाबत जागरूकता करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. या स्वच्छ भारत पंधरवड्यात पश्चिम वºहाडातील जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच खाजगी संस्थेच्या एकूण ५ हजार २८८ शाळांचा सहभाग राहणार आहे. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील २ हजार ३७४, वाशिम जिल्ह्यातील १ हजार २९७ व अकोला जिल्ह्यातील १ हजार ६१७ शाळांचा समावेश आहे.
आधुनिक प्रसार माध्यमांचा वापर करण्याच्या सूचना
स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गंत राबविण्यात येणाºया स्वच्छ भारत पंधरवड्यात आधुनिक प्रसार माध्यमांचा वापर करण्याचा सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिल्या आहेत. त्यात दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करणे, विभागाच्या संकेतस्थळावर, बेब बेस पोर्टलवर ई-बॅनर तार करणे, सोशल मिडीया, इलेक्ट्रॉनिक्स व प्रिंट मिडीयाव्दारे व्यापक प्रसिध्दी देणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत कार्यक्रम पत्रिकेत स्वच्छता विषयाचा समावेश करणे, दररोज सकाळी स्वच्छतेची शपथ घेणे, स्वच्छ भारत या विषयावरील गिताचे प्रसारण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.