विद्यार्थ्यांना पडला भागाकार, गुणाकाराचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:34 AM2021-04-21T04:34:44+5:302021-04-21T04:34:44+5:30

मार्च २०२० पासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मागील शैक्षणिक वर्ष हे ऑनलाईन शिकविण्यात गेले. मात्र या शिक्षणाचा म्हणावा तसा ...

The students forgot about division and multiplication | विद्यार्थ्यांना पडला भागाकार, गुणाकाराचा विसर

विद्यार्थ्यांना पडला भागाकार, गुणाकाराचा विसर

googlenewsNext

मार्च २०२० पासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मागील शैक्षणिक वर्ष हे ऑनलाईन शिकविण्यात गेले. मात्र या शिक्षणाचा म्हणावा तसा परिणाम झाला नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाईल आले आणि मुले गेम व कार्टून पाहण्यात रमली; तर उरलेला वेळ टीव्हीवर वेगवेगळे कार्यक्रम पाहण्यात घालवत आहेत.

शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण प्रभावी असल्याने दुसऱ्या वर्गापासूनच मुलांना उजळणी मुखोद्गत होऊ लागली. परंतु आता शाळेपासून दुरावलेल्या मुलांना जोडशब्दांचे वाचन करणे कठीण जाऊ लागले आहे. इयत्ता पाचवीच्या मुलांना भागाकार व गुणाकार कसा करायचा, याचा विसर पडला आहे. जून महिन्यात शाळेकडून पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले; परंतु कोणत्याही विषयाच्या पुस्तकाचे पान उघडून न पाहणाऱ्या मुलांना यंदा कोणते धडे अभ्यासासाठी आहेत, हेसुद्धा माहीत नाही. ऑनलाईन शिक्षण केवळ २० ते ३० टक्के विद्यार्थी प्रामाणिकपणे करीत असावेत; परंतु इतर विद्यार्थी मात्र या शिक्षणापासून वंचित आहेत. या वर्षी परीक्षा रद्द झाल्याने मुले बिनधास्त झाली असून, परीक्षाच नाही तर अभ्यास कशाला करायचा? असे मुले म्हणताना दिसत आहेत. यंदा जून महिन्यात इयत्ता पहिलीच्या वर्गात नवीन प्रवेश देण्यात आले. परंतु वर्षभर शाळा बंद असल्याने या विद्यार्थ्यांनी शाळा तर पाहिलीच नाही; परंतु गुरुजींची भेटसुद्धा झाली नाही. बाराखडीची अक्षरेसुद्धा गिरविली नाहीत, तरीही मुले आरटीई कायद्यातील नियमाप्रमाणे दुसरीत प्रविष्ट झाली आहेत.

पुढील काळात शिक्षकांना करावी लागणार कसरत

शाळास्तरावर विद्यार्थ्यांना दिशा ॲप, गुगल मिट यांसारख्या शैक्षणिक साधनांचा वापर करण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. परंतु विद्यार्थ्यांमध्ये नियमितपणा नव्हता. त्यामुळे ज्ञानाची पोकळी भरून काढण्यासाठी आता येणाऱ्या काळात शिक्षकांना चांगलीच कसरत करावी लागणार असल्याचे शिक्षणतज्ज्ञ सांगत आहेत. वर्षभरापासून मुले शाळेत जात नसल्याने त्यांना आता अभ्यासासोबतच शाळेचाही विसर पडला आहे. मुलांकडून अभ्यास करून घेण्याची मानसिकता पालकांचीही राहिली नाही. त्यामुळे हा काळ सर्वांसाठी कसोटीचा ठरत आहे.

Web Title: The students forgot about division and multiplication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.