बुलडाणा, दि. 12 - आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांच्या संगोपनाकरिता सुरू करण्यात आलेल्या नंदनवन आश्रमाला आर्थिक मदत करून समाजोपयोगी कार्यात हातभार लावण्याच्या उद्देशाने येथील एडेश शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्यावतीने तापत्या उन्हात गल्लोगल्लीत फिरून निधी गोळा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला बुलडाणेकरांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांच्या संगोपनासाठी येथील साखळी येथे अजय दराखे यांनी आश्रम सुरू केला आहे. स्वत:च्या शेतात आश्रम इमारत उभारून दराखे यांनी आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या मुलांसाठी राहण्याची व शिक्षणाची सोय केली. या ठिकाणी सध्या १८ मुले वास्तव्यास आहेत. शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. ही बाब हेरून येथील एडेड हायस्कूलमधील शिक्षक विद्यार्थ्यांनी स्वत:हून पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला.
त्याकरिता वर्ग ९ व दहावीच्या ७० विद्यार्थ्यांनी दहा विद्यार्थ्यांच्या सात चमू तयार केल्या व शहरातील विविध भागात फिरून दुकाने, हॉटेल, कार्यालये तसेच गल्लीबोळातील घरोघरी जावून पैसे गोळा करण्यात येत आहे. शनिवार व रविवार दोन दिवस ७० विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने शहरभर फिरणार आहेत. सदर गोळा झालेले पैसे १5 ऑगस्ट रोजी शाळेत आयोजित एका कार्यक्रमात नंदनवन संस्थेच्या चालकांना देण्यात येणार आहेत.
विद्यार्थी शहरभर फिरून गोळा झालेली रक्कम आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. विद्यार्थी जीवन जगत असतानाच दुस-यांना मदत करण्याचा अभिवन उपक्रम यापूर्वीही अनेकदा एडेडच्या विद्यार्थ्यांनी राबविला आहे. यापूर्वी पैसे गोळा करून वादळाने भुईसपाट झालेल्या गावांना देण्यात आला होता. या उपक्रमाकरिता व्यवस्थापक अॅड. बाळासाहेब कविमंडन, डॉ. प्रमोद देशपांडे, मुख्याध्यापक आर. ओ. पाटील, उपमुख्याध्यापक रेलकर, प्रभारी शिक्षक जी. व्ही. नागरे, आर. पी. देशपांडे, धीरज उबरहंडे, पर्यवेक्षक माधुरी कुलकर्णी, दामले यांचा सहभाग लाभला आहे.
शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थीही करणार आर्थिक मदतएडेड शाळेत तीन हजार विद्यार्थी आहेत. सदर विद्यार्थ्यांना नंदनवनला मदत करण्याकरिता मदत मागण्यात आली आहे. आपल्या इच्छेनुसार विद्यार्थ्यांना मदत करायची आहे. यासोबतच शिक्षक व मुख्याध्यापकही आर्थिक मदत करणार आहेत.