पैनगंगा नदीपात्रात वाहून जाणाऱ्या दोन मुलांना वाचविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 02:11 PM2019-10-30T14:11:17+5:302019-10-30T14:11:29+5:30
कल्याणा येथील हर्षल जनार्दन ठाकरे आणि दुधा येथील पंकज पंढरी लोढे ही दोन मुले थोडक्यात बचावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम: एकीकडे पेनटाकळी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत असतानाच बैलांना पाणी पाजण्यासाठी बैलगाडीद्वारे पैनगंगा नदीपात्रात गेलेली दोन मुले बैलगाडीसह नदीपात्रात वाहून जाताजाता थोडक्यात बजावली. दुधा-ब्रम्हपुरी येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही मुले थोडक्यात वाचली. मात्र या घटनेत बैलगाडीला जुंपलेला एक बैल मात्र ठार झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
दरम्यान, नदीपात्रात वाहून गेलेली बैलगाडी व बैलांना वाचविण्यासाठी थेट पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात कमी करण्याची विनंती पाटबंधारे विभाच्या उपअभियंत्यांना करण्यात आली होती. अल्पावधीसाठी पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे नागरिकांना दोन्ही मुलांसह वाहून जाणारी बैलगाडी व एका बैलाला वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेत दैव बलवत्तर म्हणून वाचलेल्या मुलांमध्ये कल्याणा येथील हर्षल जनार्दन ठाकरे आणि दुधा येथील पंकज पंढरी लोढे ही दोन मुले थोडक्यात बचावली.
कल्याणा येथील हर्षल जनार्दन ठाकरे हा पाचव्या वर्गात शिकणारा मुलगा दिवाळीसाठी दुधा येथे त्याचे मामा पंढरी लोढे यांच्याकडे यांच्याकडे आला होता. पंढरी लोढे यांचा मुलगा पंकज पंढरी लोढे हा दहाव्या वर्गामध्ये असून विवेकानंद मंदिरामध्ये तो शिकतो. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बैलांना पाणी पाजण्यासाठी हर्षल व पंकज हे दोघेजण बैलगाडीद्वारे दुधा येथील पैनगंगा नदीच्या पात्राकडे गेले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने व पाण्याच्या धारेत आल्याने बैलगाडी सह दोघेही वाहू लागले. हा सर्व प्रकार नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी बघितला. त्यांनी आरडाओरड केल्याने नदीकाठावर असलेल्या दुधा, ब्रह्मपुरी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभिर्य पाहता प्रसंगावधान राखून काही नागरिकांनी नदीपात्रात उड्या मारून दोन्ही मुले व एका बैलास वाचविण्यात यश मिळवले. या ग्रामस्थामध्ये समाधान हैबती म्हस्के, शालिकराम महाकाळ, गुलाबराव इटिवाड, सुरेश इटिवाड, पंडितराव देशमुख, गौरव देशमुख, नागेश महाकाळ, प्रल्हाद दळवी, रवि पवार, सुनील शेषनारायण म्हस्के यांचा समावेश होता.
दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर
पुराच्या पाण्यात वाहून जात असलेल्या दोन्ही मुलांना वाचविण्यात यश आले आहे. घटनेनंतर दोन्ही मुलांची हिवराआश्रम येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता त्यांची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालयीन सुत्रांनी सांगितले. एका बैलालाही या घटनेदरम्यान वाचविण्यात आले. दुसरीकडे ही घटना घडली तेव्हा पेनटाकली प्रकल्पाचे तीन दरवाजे दहा सेमींने उघडलेले होते. तुलनेने पाण्याचा विसर्ग कमी होता. त्यामुळे पाणी नदीपात्रातच होते. मात्र बैलगाडी व मुले ही थेट नदीतील धारेच्या प्रवाहात आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.