साखरखेर्डा तालुका निर्मितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!
By admin | Published: August 4, 2016 01:04 AM2016-08-04T01:04:19+5:302016-08-04T01:04:19+5:30
आ. शशिकांत खेडेकर यांचा औचित्याचा मुद्दा : खामगाव जिल्हय़ासह लाखनवाडा व साखरखेर्डा तालुका निर्मिती करा!
चिखली, दि. ३ : भौगोलिकदृष्ट्या घाटाखाली आणि घाटावर अशा विभागलेल्या बुलडाणा जिल्हय़ाचे विभाजन होऊन घाटाखाली खामगाव हा जिल्हा व्हावा व घाटाखाली लाखनवाडा आणि घाटावर मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदारसंघातील साखरखेर्डा या दोन तालुक्यांची तातडीने निर्मिती व्हावी, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे सभागृहात लावून धरली.
गत २५ पेक्षा अधिक वर्षांंपासून साखरखेर्डा तालुका निर्मितीचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेत लालफितीमध्ये पडून आहे. सिंदखेड राजा तालुक्यात येत असलेल्या सुमारे २0 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या साखरखेर्डा या गावावर परिसरातील सुमारे ६0 ते ६५ गावे अवलंबून आहेत. या गावासांठी ही प्रमुख बाजारपेठ असल्याने येथे दररोज हजारो लोकांची वर्दळ असते. साखरखेर्डा तालुका निर्मिती क्षेत्नात संभाव्य ८५ गावांचा समावेश असून, चार जिल्हा परिषद सर्कलचे अंतर २५ कि.मी.चे आत आहे. यात सिंदखेड राजा तालुक्यातील ३६, लोणार तालुक्यातील पाच, मेहकर तालुक्यातील २५ आणि चिखली तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. सिंदखेड राजा मतदारसंघात जी गावे आहेत; परंतु तालुके बाहेरच्या मतदारसंघातील आहेत. अशी सर्व नावे साखरखेर्डा गावाशी संलग्न असून, ती सर्व गावे संभाव्य तालुक्याशी निगडित आहेत. या गावांसाठी तालुक्याचे ठिकाण सिंदखेड राजा आणि जिल्हय़ाचे ठिकाण असलेल्या बुलडाण्याचे अंतर सारखेच आहे. भौगोलिकदृष्ट्या सिंदखेड राजा तालुका अयोग्य असून, कोठेच कशाचा मेळ नाही.