लोकमत न्यूज नेटवर्क संग्रामपुर : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रावर जोमात सुरू असून मतदानाचा हक्क बजावणाय्रा नागरिकांसाठी मतदान केंद्रावर योग्य ती सोय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून महसूल प्रशासनाने योग्य ती सोय उपलब्ध करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा, पातुर्डा, वरवट बकाल, टुनकी आणि सोनाळा या गावातील मतदान केंद्रावर जाऊन महसूल आयुक्त पियुष सिंग यांनी पाहणी केली. यावेळी दिव्यांग मतदारांमध्ये मतदान करण्या संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. सोनाळा येथे जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमांमध्ये दिव्यांग मतदारांना मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच व्हि व्हि पॅट मशीन कशी हाताळावी याची माहिती दिव्यांग मतदारांना देण्यात आली. प्रायोजिक तत्त्वावर दिव्यांग मतदारांकडून व्हीव्हीपॅट मशीन वर मतदान करून घेण्यात आले. मतदानाच्या हक्कापासून कोणताही मतदार वंचित राहू नये तसेच मतदान केंद्रावर मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारची तयारी महसूल प्रशासनाकडुन कडून केंद्रावर करण्यात येत आहे. निवडणूक आयोगातर्फे पीडब्ल्यूडी इंटरनेट ?प मतदारांसाठी उपलब्ध करण्यात आले. या ?पच्या माध्यमातून नाव नोंदणी, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे, नावे दुरुस्ती, दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर जाण्यासाठी व्हीलचेअरची मागणी या अॅपच्या माध्यमातून करता येणार आहे. मतदारांना बूथ लोकेशन याच्या माध्यमातून कळणार. मतदान केंद्राचा शोधही यातून घेता येणार आहे. त्यामुळे हे अँप मतदारांसाठी अति महत्वाचे ठरणार असून यामध्ये अनेक प्रकारची माहिती मतदारांना मिळणार आहे. या ?पचा मतदारांनी मोठ्या प्रमाणात वापर करावा असे आव्हान आयुक्तांकडून यावेळी करण्यात आले. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयी सुविधा निवडणूक आयोगाकडून प्रत्येक केंद्रावर करण्यात आल्याने दिव्यांगांना आपला मतदानाचा हक्क योग्य प्रकारे बजावता येणार आहे. सोनाळा येथे झालेल्या प्रस्ताविक येथील तलाठी तथा मास्टर ट्रेनर सिद्धेश्वर रंगधड यांनी केले. अमरावती महसूल आयुक्त पियुष सिंग यांच्यासोबत जिल्हा परिषद बुलढाणा मुख्य कार्यकारी अधिकारी शण्मुगराजन, उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली देवकर, गटविकास अधिकारी संग्रामपूर ए एल बोंद्रे तथा संग्रामपूर तहसीलदार महेश पवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
संग्रामपूर तालुक्यातील मतदान केंद्रांची आयुक्तांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 6:25 PM