लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील उप माहिती कार्यालयातील दोन कर्मचार्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. दरम्यान, यापैकी एका कर्मचार्यावर निलंबनाची टांगती तलवार कायम असल्याची खात्रीलायक माहिती आहे.खामगाव येथील उपमाहिती कार्यालयाला गेल्या काही दिवसांपासून ‘बेशिस्ती’चे ग्रहण लागले आहे. कार्यालय उघडण्यात आणि बंद करण्यात वारंवार अनियमितता होत असतानाच, शासकीय कामकाजाच्या दिवशी खामगाव येथील उप माहिती कार्यालय चक्क दोन दिवस बंद होते. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आणि मंगळवारी कार्यालय बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर माहिती कार्यालयाच्या उप संचालकांकडून या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात आली. दरम्यान, या चौकशीत तथ्य आढळल्यामुळे खामगाव येथील दोन कर्मचार्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. यामध्ये एकाचे निलंबन करण्यात येणार असून, एका कर्मचार्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे. निलंबनाची टांगती तलवार असलेल्या कर्मचार्याला यापूर्वीही बेशिस्तीमुळे निलंबित करण्यात आले होते, हे येथे उल्लेखनीय आहे.
खामगाववर बुलडाणा येथून नियंत्रण!उप माहिती कार्यालय उघडणे आणि बंद करण्यातील अनियमिततेसोबतच दोन दिवस कार्यालय बंद असल्याचे उघडकीस आल्यानंतर उप माहिती कार्यालयावर बुलडाणा येथून नियंत्रण ठेवल्या जात आहे. मंगळवारी बुलडाणा येथील सहा. माहिती नीलेश तायडे यांनी स्वत: हजर राहत येथील कामकाज सुरळीत केले.-