छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन
चिखली : फुले- शाहू- आंबेडकर वाटिकेत छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी निवृत्त न्यायाधीश सुरेश घोरपडे, दिलीप पवार, सुधाकरराव मघाडे, हिरालाल शिंगणे, सुरेश अवसरमोल, सुशील राऊत, गजानन जाधव, श्याम पवार, रवी राऊत, राहुल पडघान, सिद्धार्थ साळवे, दिलीप काळे, बाबूराव राऊत, लक्ष्मण भिसे, पवन गरड, अनिल जाधव उपस्थित होते.
सिंदखेड राजा २८ युवकांनी केले रक्तदान
सिंदखेड राजा : कोरोना महामारीमुळे रक्ताचा खूप तुटवडा आहे. ही बाब लक्षात घेत येथील टायगर ग्रुपच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमोल राठोड यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २८ दात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवला आहे.
युवा धाेरणाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार
बुलडाणा : ग्रामीण भागातील युवकांचा समावेश राज्य युवा धोरणामध्ये करावा, तसेच युवा धोरण अंमलबजावणीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांनी दिले. राज्य युवा परिषदेचे राज्यस्तरीय युवा धोरण चर्चासत्र २७ जून रोजी ऑनलाइन आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या
हिवरा आश्रम : अतिवृष्टीमुळे हिवरा आश्रम परिसरातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ३० जून रोजी आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी लोणी लव्हाळा परिसरातील शेतीची पाहणी करत नुकसान भरपाईचा सर्व्हे करण्याचा आदेश दिला आहे.
मढ रस्त्याची थातुरमातुर दुरुस्ती
धाड : धामणगाव ते मढ फाट्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन ट्रॉली मुरूम व रोडा टाकून बोळवण केली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्याची समस्या आणखीच गंभीर झाली आहे.
अटल भूजल याेजनेत निपाणाचा समावेश
तळणी : अटल भूजल याेजनेते निपाणा गावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुषंगाने भूवैज्ञानिक एस. बेनाेडे, एस. डवळे यांनी १ जुलै राेजी निपाणा ग्रामपंचातीयला भेट दिली, तसेच याेजनेच्या नियाेजनासाठी चर्चा केली.
पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान
बुलडाणा : कृषिदिनानिमित्त १ जुलै राेजी पंचायत समिती, बुलडाणा येथील सभागृहात तालुकास्तरीय पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. रब्बी हंगाम स्पर्धेत श्रीकांत आत्माराम पवार, तर द्वितीय क्रमांक सतीश पांडुरंग उबाळे यांनी मिळवला. त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
नुकसानग्रस्तांना २० हजार रुपये हेक्टरी मदत द्या
चिखली : तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
विजय राठाेड यांची निवड
सिंदखेड राजा : राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी विजय एकनाथ राठाेड यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष किसनराव राठाेड यांनी केली आहे.
अर्धवट रस्त्यामुळे शेतकरी त्रस्त
बीबी : परिसरात अनेक रस्त्यांची कामे उन्हाळ्यात सुरू करण्यात आली हाेती. सध्या पावसाळा सुरू असल्याने काम बंद आहे. बांधकामासाठी रस्ते खाेदण्यात आलेली असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
मुरादपूर येथील शेतकऱ्यांनाही मदत द्या
चिखली : २८ जून राेजी झालेल्या पावसामुळे मुरादपूर शेतशिवारात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, या गावाचा नैसर्गिक आपत्तीत समावेश करण्यात आलेला नाही. या भागातील शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.