लाच स्वीकारताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 03:38 PM2019-12-08T15:38:07+5:302019-12-08T15:38:09+5:30
तलाठी सुनिल आत्माराम डव्हळे यांना लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : एका ४० वर्षिय माजी सैनिकाच्या पत्नीच्या नावे असलेल्या शेतीची फेरफार नक्कल देण्यासाठी ३ हजार ५०० रूपयांची लाच स्विकारताना येथील तलाठी सुनिल आत्माराम डव्हळे यांना लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली आहे.
बुलडाणा येथील ४० वर्षिय सेवानिवृत्त माजी सैनिकाने तलाठी सुनील डव्हळे यांच्याकडे पत्नीच्या नावे असलेल्या शेतीची फेरफार नक्कल मागीतली होती. मात्र, डव्हळे यांनी ती देण्यासाठी ३ हजार ५०० रूपयांच्या लाचेची मागणी केली असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागबुलडाणाच्यावतीने ६ डिसेंबर रोजी चिखली येथे सापळा रचून पडताळणी करण्यात आली व तलाठी डव्हळे यांना ३ हजार ५०० रूपयांची लाच स्विकारताना ताब्यात घेण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री या प्रकरणी उशिरा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक पंजाबराव डोंगरदिवे व पोलीस उपअधिक्षक शैलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोनि अर्चना जाधव व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा पथकाने केली आहे.
(तालुका प्रतिनिधी)