- देवेंद्र ठाकरे
खामगाव: शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत तालुक्यात रोपे लावण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम रोजगार हमीकडे सोपविण्यात आले आहे. परंतु कामाचा अवाका पाहता, मजुरांचे सख्याबळ कमी पडत असल्याचे दिसत आहे. पावसाळा सुरू झाला असला, तरी अद्याप ही कामे पुर्ण झाली नसल्याची वस्तुस्थिती आहे.
ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून विविध योजनांची कामे रोजगार हमीच्या माध्यमातून करण्यात येतात. बांध घालणे, गुरांचे गोठे बांधणे यासह अनेक अकुशल कामे रोजगार हमीच्या माध्यमातून करण्यात येतात. यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळण्यास मदत होते. सध्या शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवडीचे काम खामगाव तालुक्यात रोजगार हमीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तालुक्यात एकूण ९७ गावे असून प्रत्येक गावाला १२०० वृक्ष लागवडीचे लक्ष देण्यात आले आहे. रोपट्यांची लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम गावपातळीवर रोजगार हमीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पंरतु कामाचा अवाका पाहता, यासाठी रोजगार हमीचे मजुर कमी पडत असल्याचे चित्र असून ही कामे वेळेच्या आत पुर्ण होण्याची शक्यता कमी आहे.
रोजगार सेवकांची अनास्था!
रोजगार हमीची कामे गावपातळीवर करून घेण्याचे रोजगार सेवक करत असतात. परंतु अने क गावांमध्ये रोजगार सेवकांची कामाविषयी अनास्था दिसून येत आहे. अनेक मजुरांची रोजगार हमी अंतर्गत नोंदणी झालेली नसून याचाही परिणाम मजुरांच्या संख्येवर होत आहे.
मजुरांच्या हाताला काम मिळावे, हा रोजगार हमी योजनेचा उद्देश आहे. यानुसार जास्तीत कामे या योजनेकडे कसे वर्ग करता येतील, हा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळेच वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम रोजगार हमीच्या माध्यमातून पुर्ण करण्यात येत आहे.
- उर्मिलाताई गायकी, सभापती, पंचायत समिती खामगाव.