श्रमदानाचे श्रमसाफल्य...शेततळ्यात साकारला गेला तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 06:16 PM2018-07-10T18:16:14+5:302018-07-10T18:16:30+5:30
तन्मयतेने एखादे कार्य केले की, निसर्गही त्या सकारात्मकतेला जोड देतो, असाच काहीसा प्रत्यय जस्तगाववासीयांना येत आहे. जस्तगाव ता. संग्रामपूर येथे नुकत्याच झालेल्या जलसंधारणाच्या शेततळ्यात राष्ट्रध्वजाचा तिरंगा नैसर्गिकरीत्या साकारला गेला आहे.
- श्याम देशमुख
पातुर्डा : तन्मयतेने एखादे कार्य केले की, निसर्गही त्या सकारात्मकतेला जोड देतो, असाच काहीसा प्रत्यय जस्तगाववासीयांना येत आहे. जस्तगाव ता. संग्रामपूर येथे नुकत्याच झालेल्या जलसंधारणाच्या शेततळ्यात राष्ट्रध्वजाचा तिरंगा नैसर्गिकरीत्या साकारला गेला आहे. जणू काही जलसंधारणांच्या कामांनी प्रसन्न होऊन भारतमाता आशीर्वाद देत आहे. रणरणत्या उन्हात जस्तगाव वासियांनी केलेल्या श्रमदानाचे श्रमसाफल्य अशा स्वरूपात दिसल्याने ही एक आगळीवेगळी घटना ठरली.
यावर्षी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत जस्तगावातील नागरिकांनी मोठ्या हिरिरीने सहभाग घेतला. रणरणत्या उन्हात व रात्री १ वाजेपर्यंत प्रचंड श्रमदान करून गावात पाणी साठवणुकीसाठी शेततळे, बांध खोदून ठेवले. यापैकी येथील गजानन शालीग्राम डोसे यांच्या गावालगतच्या शेतातील शेततळे पहिल्या दमदार पावसात प्रसिद्धीच्या झोतात आले. जस्तगाव शिवारात गावालगत गट नं. ८२ मध्ये गजानन डोसे यांचे पाच एकर शेत आहे. या शेतात जस्तगाववासीयांनी एप्रिलमध्ये श्रमदान करून १५ बाय १५ आकाराचे शेततळे श्रमदानातून खोदले.
अवघ्या तीन दिवसात हे शेततळे खोदून पूर्ण झाले. परिसरात ८ व ९ जुलै रोजी पावसाने दमदार हजेरी लावली. कुबेराने प्रसन्न होऊन दान रिचवावे, असा पाऊस पडला. जलसंधारणाची प्रतीक्षा फळाला आली. सर्वच शेततळी भरून निघाली यातील एका शेततळ्यात निसर्गाच्या अनोख्या रूपाचे विहंगम दृष्य साकारले गेले. शेततळ्यात पाणी साचल्याने तळातील शेवाळ वर पृष्ठभागावर तरंगला. या हिरव्या रंगाला मधोमध पांढ-या रंगाची साथ मिळाली. शेततळ्याच्या दुस-या बाजूची छाया पृष्ठभागावर पडल्याने केशरी रंग तयार झाला अक्षरश: तिरंगा शेततळ्यात साकारला गेला.
तिरंगा हा आपल्या राष्ट्रध्वजाचा रंग यातून स्पष्ट दिसू लागल्याने जलसंधारणाच्या कामांनी निसर्ग प्रसन्न झाल्याचा आभास निर्माण झाला. काम तन्मयतेने, सकारात्मकतेने केल्यास त्याचे परिणामही सकारात्मक दिसून येतात. हा सृष्टीचा नियम याठिकाणी तंतोतंत लागु पडला. निसर्गाच्या या मनोहारी रूपाने निसर्गप्रेमी आनंदून गेले.
गावक-यांनी वॉटर कप स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. गजानन डोसे यांच्या शेतातील तळ्यात तिरंगा रंग नैसर्गिकरीत्या साकारला गेला. जलसंधारणाच्या कामांना निसर्गही प्रसन्न झाला आहे. ही एक वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे. आम्ही हा निसर्गाचा आशीर्वाद समजतो.
- योगेश डोसे,
गावकरी (उपसरपंच), जस्तगाव