हाताशी आलेला एकुलता एक तरुण मुलगा अचानक आत्महत्या करून अनंताच्या प्रवासाला निघाला तर कोणत्याही कुटुंबासाठी ही उद्ध्वस्त करणारी बाब असते. अशा प्रसंगातही शिक्षिका असलेली आई काळजावर दगड ठेवत विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उमेदीची किरणे पेरण्याचे धाडस करीत होती. मात्र मुलाच्या मृत्यूची चिंता तिचा पिच्छा सोडत नसल्याने मंगला धाडये यांनीही शेवटी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.
त्या बुलडाणा पंचायत समिती अंतर्गत ग्राम चिखला येथे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. मंगला लक्ष्मण धायडे ह्या बुलडाणा येथे राहत होत्या. चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत त्या आपला संसारदेखील सावरत होत्या. त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र नियतीने वेगळाच डाव खेळला. याबाबतची फिर्याद भाऊ विजय धायडे यांनी धामणगांव बढे पोलीस ठाण्यात दिल्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती १९ जुलै रोजी पोलिसांनी दिली.
दु:खातून सावरुच शकल्या नाही
काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मंगला धायडे यांचा मोठा आधार गेला. मुलाच्या अकाली निधनामुळे मंगला यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखातून त्या सावरू शकल्या नाहीत. काही काळ काळजावर दगड ठेवून त्या शाळेमध्ये विद्यादानाचे कार्य करीत राहिल्या. मात्र १७ जुलै रोजी मंगला धायडे या आपल्या नातेवाईक यांच्या गुळभेली येथील घरी गेल्या होत्या. तेथेच बाथरूमच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.