- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : जिल्हा परिषद शाळा सुरू होऊन १५ दिवस झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश खरेदीला सुरूवात झाली आहे. शाळा व्यवस्थापन समिती व मुख्यध्यापकांच्या बँक खात्यावर नुकतेच गणेवशाचे अनुदान प्राप्त झाले असून आता गणवेश खरेदीसाठी मुख्यध्यापक व शिक्षकांना शहरीभागातील कापड दुकानांवर जाण्याची वेळ आली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शासनाच्यावतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येतो. शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार त्यांच्या गणवेशसाठी लागणार निधी देण्यात येतो. गतवर्षी हा निधी थेट विद्यार्थ्यांच्या नावाने त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात आला होता. मात्र यावर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे २६ जूनला मुलांना गणवेशाचा निधी मिळालाच नाही. यावर्षी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निधी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्षांच्या संयुक्त बँक खात्यात टाकण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदकडून आलेल्या निधीतून शाळा व्यवस्थापण समिती व मुख्यध्यापकांनी गणवेश खरेदी करून शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना द्यायला हवा होता. मात्र शाळा व्यवस्थापन समिती व मुख्यध्यापकांच्या संयुक्त बँक खात्यावर हा निधी शाळा सुरू होण्याच्या दहा दिवसानंतर मिळाला. जिल्ह्यातील १ लाख ४० हजार ४३८ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ८ कोटी ४२ लाख ६२ हजार ८०० रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही रक्कम ३ ते ४ जुलै रोजी गट शिक्षणाधिकाºयांच्या खात्यात जमा झाली. त्यानंतर संबंधित शाळांच्या बँक खात्यामध्ये ६ ते ७ जुलैच्या दरम्यान पाठवण्यात आली. आता जिल्हा परिषद शाळा सुरू होऊन १५ दिवस होत आहेत. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. बहुतांश शाळांमध्ये १० जुलैपासून गणवेश खरेदीची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी शिक्षक, मुख्यध्यापकच थेट शहरातील कापड दुकानावर पोहचत आहेत. विद्यार्थ्यांचे गणवेश खरेदी करण्याची नवीन जबाबदारी शिक्षक मुख्यध्यापकावर पडली आहे. गणेवश खरेदीने मुख्यध्यापकांसह शिक्षकांची डोकेदुखी वाढवीली आहे.
शिक्षकांची कापड दुकानदारांकडे ‘सेटिंग’
जिल्हा परिषद मुख्यध्यापक, शिक्षकांनाही कापड दुकानदारांकडे गणवेश खरेदीसाठी सेटिंग लावावी लागत आहे. एका गणवेशासाठी ३०० रुपये म्हणजे एका विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी ६०० रुपये अनुदान दिल्या जात आहे. विद्यार्थी संख्या जास्त असल्याने व एका विद्यार्थ्याचे दोन गणवेश त्यामुळे गणवेशाची संख्याही जास्त होत असल्याने कमी किंमतीत गणवेश कसे बसतील यासाठी ओळखीचा कापड दुकानदार पकडण्यात येत आहे.