विना नंबरच्या रेती वाहनावर तहसीलदारांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:06 AM2021-02-28T05:06:47+5:302021-02-28T05:06:47+5:30
मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर पूर्णा नदी आहे. या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर रेतीचे साठे आहेत. प्रशासनाच्या वतीने या रेतीसाठ्याचा लिलाव ...
मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर पूर्णा नदी आहे. या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर रेतीचे साठे आहेत. प्रशासनाच्या वतीने या रेतीसाठ्याचा लिलाव करून रेती वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे रेतीचा उपसा व वाहतूक करण्यासाठी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जिल्हाभरातील वाहने दाखल होत आहेत, परंतु यापैकी बहुतांश वाहने हे विना नंबर दिसत आहेत. या नदीवर जाण्यासाठी आताच नवीन झालेला पंढरपूर शेगाव हा महामार्ग असल्याने वाहन चालक भरधाव वेगाने रेतीची वाहतूक करीत आहेत. त्यामुळे एखादे वेळी विना नंबरच्या वाहनाने अपघात झाल्यास कोणत्या वाहनावर कारवाई करावी, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वास्तविक पाहता, वाहनांना नंबर देण्याची जबाबदारी ही उपप्रादेशिक परिवहन विभागाची आहे, परंतु अनेक वाहन मालक वाहनावर नंबर न टाकताच सर्रास रेतीची वाहतूक करीत आहेत. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच तहसीलदार सैपन नदाफ यांनी आजपासून कर्मचाऱ्यांसह वाहन तपासणी मोहीम सुरू केली. त्यामध्ये बहुतांश वाहने ही विना नंबरची आढळून आली आहेत, तसेच अनेक रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रेती झाकण्यासाठी नेट किंवा ताडपत्री आढळून आली नाही. त्यामुळे तहसीलदार यांनी पेंटरला सोबत घेत, त्या वाहनावर नंबर टाकून घेतले, तसेच वाहन चालकाला नेट आणण्यास भाग पाडले. या पुढे विना नंबरच्या वाहनाने रेतीची वाहतूक केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार सैपन नदाफ यांनी दिला आहे. या करण्यात आलेल्या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंजाबराव खोकले, तलाठी विजय पोफळे, महसूल सहायक भगवान मुसळे, महसूल सहायक रवी वाघ, तलाठी संतोष जाधव, महसूल सहायक विलास तुपकर, किशोर मादनकर यांनी सहभाग घेतला होता.