...तर नोव्हेंबर अखेर बुलडाणा जिल्ह्यात ५० हजार कोरोना रुग्ण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 10:48 AM2020-07-21T10:48:06+5:302020-07-21T10:48:42+5:30
आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा ५० हजारांच्या पार जाण्याची शक्यता जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत असून असून आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा ५० हजारांच्या पार जाण्याची शक्यता जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी व्यक्त केली आहे. सोमवारी शांतता समितीच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
दरम्यान, समितीची बैठक झाल्यानंतर यासंदर्भात त्यांना पुन्हा तेथेच याबाबत विचारणा केला असता ही रुग्ण संख्या वाढण्याच्या शक्यतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. वरिष्ठ पातळीवर प्राप्त माहितीनुसार येत्या काळात ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीदरम्यान बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. दोन दिवसापूर्वी वरिष्ठ पातळीवर राज्यस्तरावर झालेल्या बैठकीदरम्यान बुलडाणा जिल्ह्याला कोरोना रुग्ण वाढण्याच्या शक्यतेचा अलर्ट देण्यात आला असल्याचेही पालकमंत्र्यांनी शांतता समितीच्या बैठकीत शेवटी सांगितले. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी असून आरोग्य क्षेत्रातही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. अशा स्थितीत नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर सतर्कता बाळगण्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
देशातील काही मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश असल्याने वेळीच खबरदारी न बाळगल्यास जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा हा नोव्हेंबरअखेर वाढण्याची शक्यताही आहे.
या दरम्यान कोरोना संसर्गाची दुसरी लाट येवू शकते, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. या व्यतिरिक्त नव्याने मिळालेल्या माहितीनुसार तथा अभ्यासानुसार थेट श्वासातूनही त्याचा प्रसरा होण्याची भीती आहे. शिंकेद्वारे किंवा मोठ्याने खोकल्यानेही त्याचा प्रसार होण्याची भीती त्यामुळे निर्माण झाली असल्याचे जिल्हाधिकारी चंद्रा म्हणाल्या. त्यानुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देण्यावर भर असल्याचे त्या म्हणाल्या.
मानव विकास निर्देशांक कमी
मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत बुलडाणा जिल्हा देशात मागासलेला आहे. बुलडाणा जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक हा ०.६८४ आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. आरोग्य विषयकही पायाभूत सविधा कमी आहे. अशा स्थितीत जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येत असून गेल्या ११५ दिवसात त्यादृष्टीने भरीवपणे जिल्ह्यातील आरोग्य विषयक सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला असून नागरिकांनीही प्रशासनाने दिलेल्या सुचनांची परीपूर्णपणे अंमलबजावणी करावी, असे ही स्पष्ट करण्यात आले.