बुलडाणा जिल्ह्यात रानभाज्या महोत्सवाचे आयोजनच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 11:28 AM2020-08-11T11:28:55+5:302020-08-11T11:29:48+5:30
बुलडाणा जिल्ह्यात मेळावा घेण्याएवढे परिमाण नसल्याचे कारण देत कृषी विभागाने महोत्सव घेतला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शहरी भागातील जनतेला रानभाज्यांची उपयुक्तता, आवश्यकता आणि महत्त्व कळावे, या भाज्यातील औषधी गुणांची माहिती व्हावी आणि त्यांच्या आहारातही या भाज्यांचा समावेश असावा, या उद्देशाने कृषिमंत्र्यांनी ९ आॅगस्ट रोजी फिजिकल डिस्टन्सिंग राखून रानभाजी महोत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात मेळावा घेण्याएवढे परिमाण नसल्याचे कारण देत कृषी विभागाने महोत्सव घेतला नाही.
शेतशिवारात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांचे, रानफळांचे महत्त्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांच्या आहारात त्या भागात उगवणाºया रानभाज्यांचा समावेश असतो. या भाज्या, फळांचे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. त्याची माहिती शहरांतील नागरिकांना मिळून विक्री व्यवस्था झाल्यास शेतकºयांनाही काही आर्थिक फायदा होणार आहे. विशेष म्हणजे रानभाज्यात विविध पौष्टिक अन्नघटक असतात. या रानभाज्या नैसर्गिकरीत्या उगवत असल्याने त्यावर कीटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी केली जात नाही. या नैसर्गिक आहार संपत्तीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊनच शहरी भागातील लोकांत रानभाज्यांबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर ९ आॅगस्ट रोजी रानभाजी महोत्सव साजरा करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिले होते. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात महोत्सव घेण्याएवढया रानभाज्या नसल्याने मेळाव्यांचे आयोजनच करण्यात आले नाही.