बुलडाणा जिल्ह्यात समुह संसर्गाचा धोका नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 11:19 AM2020-07-15T11:19:25+5:302020-07-15T11:19:46+5:30
जिल्ह्यात समुह संसर्गाचा धोका नसल्याचे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा साडेपाचशेच्या टप्प्यात आला आहे. दरम्यान, जुलै महिन्यात झपाट्याने कोरोना संसर्गामध्ये वाढ होत असली तरी जिल्ह्यात समुह संसर्गाचा धोका नसल्याचे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, जुलै अखेर बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा ७०० च्या पार जाणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज असल्याचेही त्या म्हणाल्या. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात डिसेंबर अखेर कोरोना बाधीतांचा आकडा अडीच हजारांच्या घरात जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर प्रशासकीय पातळीवर पायाभूत सुविधांच्या तयारीच्या अनुषंगाने चर्चा झाल्यानंतर खा. प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही बाब अधोरेखीत केली.
जून जुलै मध्ये बुलडाणा जिल्ह्यात ६७५ च्या आसपास कोरोना बाधीतांचा आकडा जावू शकतो असा प्रशासकीय पातळीवरील अंदाज सध्या तंतोतंत येत असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र डिसेंबर दरम्यानच्या स्थिती बाबत आयसीएमआरकडून अद्याप कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचे त्या म्हणाल्या. मात्र बुलडाणा जिल्ह्यात वर्तमान स्थितील कोवीड केअर सेंटर, कोवीड हेल्थ सेंटर आणि दहा समर्पीत कोवीड रुग्णालयात संभाव्य स्थिती हाताळण्याच्या दृष्टीने प्रशासन सज्ज असून तीन हजार ६०० च्या आसपास बेडची सुविधा सध्या उपलब्ध असल्याचे त्या म्हणाल्या.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी इंडेक्स पर्सन आणि त्याच्याशी संबंधीत व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत असल्याने बुलडाणा जिल्ह्यामध्ये समुह संसर्गाचा धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या व्यतिरिक्त जिल्ह्यातील बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५५ टक्क्यांच्या आसपास सध्या आहे तर देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२ टक्के आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे तसे सारखे बदलत असल्याचेही जिल्हाधिकारी सुमन चंद्रा म्हणाल्या.
जिल्ह्यात रॅपीड कीटद्वारे टेस्टींग सुरू झाल्यानंतर रुग्ण वाढीचा वेग वाढला असून आणखी चार हजार रॅपीड टेस्ट किटचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या चाण्यांचा वेग आणखी वाढणार असल्याचे संकेत अप्रत्यक्षरित्या त्यांनी बोलताना दिले. रॅपीड टेस्ट किटसाठी तथा कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांच्या निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्याच्या आवाहनाला लोकप्रतिनिधीकंडून प्रतिसाद मिळाला. दरम्यान, रॅपीड टेस्ट किट घेण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरणार असल्याचे त्या म्हणाल्या. आगामी काळात जवळपास १४ हजार रॅपीड टेस्ट किट जिल्ह्याला लागण्याची शक्यता असून त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर सध्या सज्जता असल्याचे त्या म्हणाल्या. कोरोना संसर्गाची व्याप्ती कमी करण्यासाठी तथा रुग्णांना त्वरित सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यात पायाभूत सुविधा वाढविण्यास प्राधान्य देण्यात आले असल्याचे त्या म्हणाल्या.
कोवीड रुग्णालय लवकरच पुर्णत्वास
येथील स्त्री रुग्णालयामध्ये सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून समर्पीत कोवीड रुग्णालयातील आॅक्सीजन युनीटसह अन्य आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्यातून हे काम होत असून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत होण्यास आणखी दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. वीज व्यवस्थेसह वीज रोहीत्र येथे उभारण्यासह अन्य काही कामे अल्पावधीत पूर्ण होऊन हे रुग्णालय दोन आठवड्यानंतर कार्यान्वीत होईल.