- योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेले अफाट निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करणारेे आहे. मात्र, याठिकाणी पर्यटकांसाठी पाहिजे त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत. सातपुड्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास नक्कीच कायापालट होऊ शकतो. यासाठी आवश्यकता आहे ती वन विभाग व लोकप्रतिनिधींनी सकारात्मक पावले उचलण्याची.सातपुडा पर्वतरांगांचा विस्तार नागपूरपासून नाशिक जिल्ह्यापर्यंत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर हे दोन तालुके सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले आहेत. या दोन्ही तालुक्यांलगत असलेल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये विविध आकर्षक स्थळे आहेत. याठिकाणी असलेल्या अमाप नैसर्गिक साैंदर्यामुळे पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत असतात. यामध्ये जिल्हाभरातील पर्यटकांसोबतच अकोला, अमरावती, जळगाव व वाशिम जिल्ह्यांतील काही भागांतील पर्यटकांचा समावेश आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे पर्यटकांना खाण्या-पिण्याचे सर्वच साहित्य सोबत घेऊन गेल्याशिवाय पर्याय नसतो. ही अडचण सोडविण्यासाठी पर्यटन स्थळ म्हणून दर्जा मिळाल्यास आवश्यक सर्व साहित्य या परिसरातच उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते. याकरिता जिल्ह्यातील खासदार व सातही आमदारांनी हा प्रश्न शासनस्तरावर रेटून त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. जिल्ह्यालगत असलेल्या सातपुडा पर्वतरांगांना पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास जिल्ह्याला राज्यभरात नावलौकिक मिळू शकतो.
सातपुड्यातील महत्त्वाची ठिकाणे
- पुरातन पशुपतिनाथ मंदिर
- शिवकालीन मैलगड
- एकटा हनुमान
- जटाशंकर धबधबा
- सोनबर्डी धरण
- गोराळा धरण
- राजुरा धरण
- भिंगारा येथील तलाव
- भिंगारा येथील राजे सिताब खाँ यांचा महाल
- बिडीचा देव
- गोरक्षनाथ-बाल गोविंद महाराज
- वारी हनुमान
- वसाडी येथील पार्क
- अंबाबरवा अभयारण्य
- हनुमान सागर वान प्रकल्प
- मांगेरी महादेव
- हत्तीपाऊल धरण
आदिवासींची गावेभिंगारा, गोराडा, डुक्करदरी, चारबन, उमापूर, गारपेठ, हनवतखेड, रायपूर, चाळीस टापरी, गोमाल, नांगरटी, बांडापिंपळ, कहूपट्टा, निमखेडी, वसाडी, हेलापाणी, सालबर्डी, सोनबर्डी, वडपाणी, काल्माटी, वसाडी, सायखेड. राजूरा.