बुलडाणा: नागपूर- मुंबई या महत्वकांक्षी समृद्धी महामार्गाचे काम राज्यात विविध पॅकेजमध्ये सुरू झालेले आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ८७ किलोमीटर लांबीचे काम दोन पॅकेजमध्ये सुरू आहे. यामधील सहा क्रमांकाच्या पॅकेजमधील कामाची पाहणी शनिवारी करण्यात आली. महामार्गाचा दर्जा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महामार्गाच्या निर्मितीमध्ये दर्जाबाबत कुठलीही तडजोड करू नये, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.समृद्धी महामार्गाच्या मेहकर तालुक्यातील आंध्रुड शिवारातील कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी कंपनीच्या आंध्रुड येथील साईट कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत आढावा घेताना मंत्री शिंदे बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमुलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, उपविभागीय अधिकारी विवेक काळे, तहसिलदार संजय गरकल, कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, उपअभियंता संतोष इखार आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रस्ता कामात पाईप लाईन गेलेल्या शेतकऱ्यांना पाईप लाईन टाकून देण्याचे सूचीत करीत मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रस्ता काम करताना शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान करावे. रस्ता कामात कुठेही मोठे दगड वापरू नयेत. रस्त्यामुळे या परीसरातील नागरिकांच्या जीवनमानात निश्चितच बदल होणार आहे. येथील आर्थिक-सामाजिक परिस्थितीत परिवर्तन होणार आहे. रस्त्याचे काम विहीत कालावधीत पूर्ण करून विकास साधावा, असे त्यांनी सांगितले.असे आहे बॅच क्रमांक सहा व सात मधील काममहामार्गाची लांबी ३६.१०० किलोमीटर, रस्त्याची रूंदी १२० मीटर, मेहकर इंटरचेंज जवळ एक टोल प्लाझा, मोठे पूल एक, छोटे पूल १६, मोठ्या वाहनांसाठी अंडरपास आठ, ओव्हर पास ६, छोट्या वाहनांसाठी अंडरपास २, पशु व पादचाºयांसाठी अंडरपास २२, पादचारी पूल २ अशाप्रकारे काम सहा क्रमाकांच्या बॅचमध्ये होत आहे. हे काम मेहकर तालुक्यात आहे. बॅच क्रमांक सात मध्ये महामार्गाची लांबी ५१.१९० कि.मी., रूंदी १२० मीटर, इंटरचेंज २, उड्डाणपूल ९, मोठे पूल १, क्रॉस सेक्शन ८१, छोटे पूल १७, टोल प्लाझा २ (दुसरबीड व सिंदखेड राजा), अंडरपास १०, छोट्या वाहनांसाठी अंडरपास १, सर्व्हिस रोड ३.१९८ कि.मी, ओव्हर पास ४ अशाप्रकारे काम सात क्रमांकाच्या बॅचमध्ये होत आहे. या संपूर्ण रस्त्याची जिल्ह्यातील लांबी ८७ किलोमीटर आहे. रस्ता मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा व लोणार या चार तालुक्यांमधून जात आहे.
समृद्धी महामार्गाच्या दर्जाबाबत कुठलीही तडजोड नसावी - एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 2:15 PM