लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला सुरूवात झाली असून ११ जूनला रात्री १२ वाजेपर्यंत शिक्षकांना बदलीपोर्टलवर आॅनलाइन आवेदन पत्र भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एक हजार ९५ शिक्षक बदलीपात्र आहेत. त्या बदलीपात्र शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असल्यामुळे बदली पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी शिक्षकांची लगबग सुरू आहे.प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आॅनलाइन बदल्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांचे मॅपिंग करण्याचे काम सुरू होते. बदलीपोर्टलवर शिक्षकांची संपुर्ण माहिती टाकण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील संवर्ग निहाय बदलीपात्र शिक्षकांचा आकडा स्पष्ट झाला. त्यानुसार जिल्ह्यात एकूण १ हजार ९५ शिक्षक बदलीपात्र ठरले आहेत.त्यामध्ये मराठी माध्यमाचे ९७८ व उर्दू माध्यमाचे ११७ शिक्षक बदलीपात्र ठरले आहेत. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे पोर्टल अद्याप अनेक जिल्ह्यात चालू झाले नव्हते; मात्र गेल्या दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यात बदली पोर्टलवर बदलीपात्र शिक्षकांसाठी आॅनलाइन अर्ज उपलब्ध करूण देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील संवर्ग एक ते चार पर्यंतच्या एकूण १ हजार ९५ बदलीपात्र शिक्षकांसाठी ७ जून रोजी सकाळी ७ वाजेपासून आवेदनपत्र भरण्यासाठी बदली पोर्टलच्या शाळा लॉगिनमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.संवर्ग एक ते चार मधील शिक्षकांना आपले आॅनलाइन आवेदन पत्र भरण्याची अंतिम मुदत ११ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत देण्यात आलेली असून शिक्षकांकडे अर्ज भरण्यासाठी कमी दिवस राहिल्याचे दिसून येत आहे. यंदा मुदतवाढ नाही!बदलीपात्र शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर अनेक वेळा जिल्हा परिषद स्तरवरून मुदत वाढ दिली जाते. मात्र यावर्षी बदलीपोर्टलवर आॅनलाइन आवेदन पत्र भरण्यासाठी शिक्षकांना ११ जून ही अंतीम मुदत असून त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदत वाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे. तसे पत्र जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीला गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील एक हजारावर शिक्षक बदलीच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 2:08 PM