बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जावून सर्वे करणाºया अंगणवाडी सेविकांचे रजिस्टर हिसकावून त्यामध्ये लिहिलेली माहिती खोडातोड केली. एवढेच नाही तर सेविकेस जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी रायपूर येथे घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाने देशात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे १७ रुग्ण आढळले आहेत. त्यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने गाव, शहरांमध्ये गृहभेटी मोहिमेला सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे व इतर माहितीची नोंद घेतल्या जात आहे. शुक्रवारी सकाळी रायपूर येथील अंगणवाडी सेविका सर्वे करीत होत्या. यावेळी सैय्यद फिरोज सैय्यद अनिस, शेख एजाज शेख हासन, शेख कलीम शेख बनु यांनी सेविकांना विरोध केला. सेविकांचे सर्वे रजिस्टर हिसकावून घेत त्यामध्ये खोडातोड केली. एवढ्यावरच आरोपी थांबले नाही. तर त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे रायपूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार सुभाष दुधाळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय योगेंद्र मोरे करीत आहेत.
कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकांचे रजिस्टर हिसकावून जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 3:12 PM