गुजरातमधून बुलडाण्यात दाखल होतात खासगी तीन बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 11:03 AM2020-06-27T11:03:10+5:302020-06-27T11:03:43+5:30
गुजरात राज्यातून दररोज बुलडाण्यात तीन खासगी बस दाखल होत आहे.
- संदीप वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली होती. संचारबंदीत शिथीलता देत प्रशासनाने जिल्ह्यांतर्गंत प्रवासास मुभा दिली असली तरी गुजरात राज्यातून दररोज बुलडाण्यात तीन खासगी बस दाखल होत आहे. या बसेसच्या माध्यमातून प्रवाशांची दररोज वाहतुक होत आहे. या प्रवाशांची कुठलीही आरोग्य तपासणी होत नसल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.
मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातून दररोज बसेस धावत असून प्रवाशांची ने-आण करीत आहेत. विशेष म्हणजे या बसमधील प्रवाशांची कुठलीही आरोग्य तपासणी होत नसल्याने बुलडाणा शहरात कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील एका खासगी बस चालकावर कारवाई झाल्याने या बसेस काही दिवसांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच गुजरात राज्यातून मात्र बसेस सुरूच असून त्यांचा वेळ बदलण्यात आला आहे. गुजरात राज्यात जाण्यासाठी या खासगी बसेस एका प्रवाशाकडून दोन ते तीन हजार रुपये भाडे घेत असल्याचे चित्र आहे. दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रशासनाने विविध नियम व अटी घालून दिल्या आहेत. तसेच परराज्यात प्रवाशी वाहतुक बंद करण्यात आली आहे. तरीही गत महिनाभरापासून गुजरातमधून शेकडो प्रवाशी बुलडाणा शहरात येत आहेत.
परिवहन विभागाचे दुर्लक्ष
बुलडाणा शहरातून खासगी बसेस धावत असताना परिवहन विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. एरव्ही दुचाकी चालकांवर कारवाई करणारे वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचाऱ्यांचेही या खासगी बसेसकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे.
दलालांकडून होते बुकींग
या खासगी बससाठी काही दलाल जयस्तंभ चौकात सक्रीय आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रवाशांची बुकींग होते. काही बसेसवर कारवाई करण्यात आल्याने वेळ बदलण्यात आली असून रात्रीतून प्रवाशी वाहतुक होते.
चार ते सहा हजार रुपये भाडे
इतर जिल्ह्यातून बुलडाणा, मेहकरमध्ये येणाºया खासगी बस प्रवाशांकडून तब्बल चार ते सहा हजार रुपये भाडे वसुल करीत आहेत. दुसरा पर्याय नसल्याने प्रवाशीही जास्तीचे भाडे देउन धोकादायक प्रवास करीत आहेत.
प्रवाशी वाहतुक करणाºया परराज्यातील खासगी बस व इतर वाहनांवर कारवाई सुरूच आहे. आतापर्यंत १२ वाहन चालकांना मेमो दिले आहेत. तसेच ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
- जयश्री दुतोंडे, उपप्रादेशिक
परिवहन अधिकारी, बुलडाणा