कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यात तीन युवक अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:12 AM2020-09-21T11:12:10+5:302020-09-21T11:12:34+5:30
सांडव्यातील झाडाचा आधार मिळाल्याने ते बचावले आहे. मात्र अद्याप त्यांना बाहेर काढण्यात यश आलेले नाही.
मेहकर: तालुक्यातील कोरोडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी गेलेले तीन मुले अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे सांडव्यात अडकले आहे. प्रवाहासोबत वाहून जात असताना सुदैवाने त्यांना सांडव्यातील झाडाचा आधार मिळाल्याने ते बचावले आहे. मात्र अद्याप त्यांना बाहेर काढण्यात यश आलेले नाही.
सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. २० सप्टेंबर रोजी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यातल्या त्यात मेहकर तालुक्यात हा पाऊस अधिक होता. त्यातच कोरोडी प्रकल्प भरल्याने त्याच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे पोहोण्याचा मोह न आवरल्याने देऊळगाव माळी येथील तीन मुले सकाळीच कोरोडा प्रकल्पाच्या सांडव्यावर पोहण्यास गेले होते. निसर्गरम्य वातावरण व खळखळणारे पाणी पाहता या तिघांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र पाण्याचा प्रवाह अचानक वाढला तथा एकंदरीत पाण्याच्या प्रवाहाचा अंदाजही या तिघांना आला नाही. मात्र सुदैवाने सांडव्याच्या परिसरात असलेल्या झाडाचा या तिघांना आधार मिळाला. त्याला धरून ते सुरक्षीत झाले. सकाळीच फिरण्यासाठी परिसरात गेलेल्या ग्रामस्थांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे देऊळगाव माळी येथील ग्रामस्थांनी त्वरित कोराडी प्रकल्प व सांडव्याच्या परिसरात धाव घेतली. आता या तिघांना वाचविण्याचे प्रयत्न ग्रामस्थांनी सुरू केले आहे. या घटनेची माहिती मेहकरचे तहसिदार डॉ. संजय गरकल, ठाणेदार आत्माराम प्रधान यांना देण्यात आली असून तेही घटनास्थळी दाखल झाले आहेत.