टिळक स्मारक महिला मंडळाने संस्कार रुजविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 03:55 PM2019-11-17T15:55:02+5:302019-11-17T15:55:07+5:30
खामगाव येथे टिळक स्मारक महिला मंडळाचा शताब्दी महोत्सव शनिवारी थाटात पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सध्या घरे मोठी झाली असली, तरी मनातील जागा लहान झाली आहे. अशा अवस्थेत टिळक स्मारक महिला मंडळाने संस्कार रूजविण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले. खामगाव येथे टिळक स्मारक महिला मंडळाचा शताब्दी महोत्सव शनिवारी थाटात पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. जोशी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साहित्य मंडळाचे सदस्य डॉ.गजानन नारे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विलास देशपांडे, उत्सव प्रमुख विद्या कावडकर, नगराध्यक्ष अनिता डवरे उपस्थित होते. प्रास्ताविक उत्सव प्रमुख विद्या कावडकर यांनी केले.
पुरूषांच्या हस्तक्षेपाशिवाय १०० वर्षे चालणारे टिळक स्मारक महिला मंडळ ही संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपाययोजना करण्यात आल्या. ‘लेक वाचवा’, ‘संस्कृती वाचवा’, वृध्दांची हेटाळणी थांबवा याबाबत मंडळाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. महिलांच्या अन्याय-अत्याचारा विरोधातही टिळक स्मारक महिला मंडळाने काम केले, असे विद्या कावडकर प्रास्ताविकात म्हणाल्या. संस्था चालविणे हे कठीण काम आहे; मात्र विचार, तन्मयता, प्रामाणिकपणाने टिळक स्मारक महिला मंडळाने सचोटीने आपले कार्य पुढे नेले.
समाजात ३ प्रकारचे लोक असतात. काही लोक बोलतात, काही कामाचे बोलतात तर काहींचे काम बोलते. ज्यांचे काम बोलते, त्यांच्यापैकी टिळक स्मारक महिला मंडळ आहे, असे डॉ. नारे म्हणाले.
दरम्यान, टिळक स्मारक महिला मंडळाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला. कार्यक्रमाला टिळक स्मारक महिला मंडळाच्या अध्यक्ष सुषमा भाटे, सचिव श्वेता तारे, उपाध्यक्ष ज्योती खांडेकर, सहसचिव रेखा खानझोडे, सीमा देशमुख आदींसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
(प्रतिनिधी)