वरवट बकाल (बुलडाणा) : संग्रामपूर तालुक्यातील मारोड येथील विलगीकरण कक्षातील शौचालयाची स्वच्छता १० वर्षाच्या चिमुकल्याकडून करवून घेतल्याप्रकरणी ग्रामसेवक विलास शिवदे यांना निलंबित करण्यात आले. तर गटविकास अधिकारी संजय पाटील यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार गावनिहाय शासकीय इमारतीत विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले. त्यात निवासासह रुग्णांना शौचालयाची सुविधा देण्यात आली. संग्रामपूर तालुक्यातील मारोड येथील विलगीकरण कक्षातील शौचालयाची सफाई चक्क एका १० वर्षाच्या चिमुकल्याकडून करून घेण्यात आली. हा प्रकार लोकमतने उघड केला. त्यामुळे खळबळ उडाली. या निंदणीय घटनेचा समाजातील सर्व स्तरावरुन निषेध करण्यात आला. याप्रकाराला जबाबदार धरून विलगीकरण कक्ष समिती सदस्यांपैकी असलेल्या मारोड ग्रामसेवक विलास शिवदे यांना निलंबित करण्यात आले. तसेच घटनेची जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेत चौकशी समिती गठीत केली. समितीकडून ३ दिवसात अहवाल मागवला. जिल्हास्तरीय समितीने संग्रामपुरात भेट दिली. विलगीकरण कक्ष समितीमध्ये अध्यक्ष तलाठी तर ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी , शिक्षक यांचा समावेश आहे. मात्र समितीपैकी एकमेव ग्रामसेवकालाच का जबाबदार धरण्यात आले. इतरांची जबाबदारी कोणती? माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेला जबाबदार कोण, महिला व बाल कल्याण कार्यालयाची भूमिका कोणती, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. शौचालयची साफसफाई करुन घेणाऱ्या संबंधिता विरुद्ध कारवाईची मागणी भाऊ भोजने यांनी केली आहे.