या प्रकरणात मारहाण झालेला व्यक्ती हा बेशुद्ध पडला होता. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर तो शुद्धीवर आला. त्याच्या जबाबावरून पोलिसांनी नंतर ही कारवाई केली. राजू गुलाबराव तायडे असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून, २० डिसेंबर रोजी सैलानी येथील एका टेकडीवरही घटना घडली होती. सध्या राजू तायडेवर मलकापूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. चौकशीत धामणगाव बढे येथील एक महिला, जळगाव खान्देश जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथील शाकीर शहा उर्फ मस्तान व सैलानी येथून औरंगाबाद येथील अजीम शेख या तिघांना पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी अटक केली होती. या आरोपींनी राजू तायडे यास सैलानी येथे बोलावून मारहाण केली होती. मात्र नेमक्या कोणत्या कारणासाठी राजू तायडे यास सैलानी येथे बोलविण्यात आले होते ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.
या प्रकरणात पोलिसांनी चार हजार रुपये व मोबाइल लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. रायपूर पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे, पोलीस कॉन्स्टेबल अरुण झाल्टे, अमोल कवई आणि श्रीकांत चितवार यांनी ही कारवाई केली. प्रकरणातील अटक आरोपींना धामणगाव बढे, यावल आणि सैलानी येथून अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास रायपूर पोलीस करत आहेत.