मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड हे वाशिम जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकी अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रिसोड येथे कर्तव्य पार पाडत होते. दरम्यान, लोणार तालुक्यातील सावरगाव मुंढे येथे कार्यरत असलेले तलाठी अनील माणिकराव गरकळ हे वाशिम जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार रॅली मध्ये तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत वेगवेगळ्या सभांमध्ये सहभागी असल्याचा प्रकार समोर आला. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) (वर्तणूक) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला राजकीय प्रचार किंवा पक्षाचे कामकाजात सहभागी होता येत नाही, असे असताना तलाठी अनिल गरकळ प्रचारामध्ये सहभागी झाले होते. याशिवाय लोणारचे तहसीलदारांनी तलाठी अनिल गरकळ मुख्यालयी राहत नसल्याबाबत व सतत गैरहजर असल्याबाबतचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांना सादर केला होता. या पार्श्वभूमीवर मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी पी. एम. किसान योजनेचे कामकाज विहित मुदतीत पूर्ण न करणे, विनापरवानगी साझा मुख्यालय अनुपस्थित राहणे, वाशिम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रचार करणे, कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, तलाठी मासिक सभेला नेहमी अनुपस्थित राहणे या कारणावरून जिल्हा चौकशी समितीकडे हे प्रकरण सादर केले होते. जिल्हा चौकशी अधिकारी यांच्या चौकशीअंती वाशिम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रचार करणे, यासोबतच कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणे यामध्ये अनिल गरकळ हे दोषी आढळले. या चौकशी समितीच्या अहवालावरून मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी अनील माणिकराव गरकळ यांना शुक्रवारी सेवेतून बडतर्फ केल्याची कार्यवाही केली आहे.
अनिल माणिकराव गरकळ यांच्यावर जे दोषारोप ठेवण्यात आले होते, याकरिता विभागीय चौकशी सुरु करण्यात आली होती. या चौकशीमध्ये दोषी आढळल्याने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
गणेश राठोड, उपविभागीय अधिकारी, मेहकर.