चुलीवरच्या मांड्यांनी दिला महिलांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 04:11 PM2019-06-23T16:11:23+5:302019-06-23T16:11:52+5:30

खवय्यांची रूची हेरून त्यांना मागणीनुसार चुलीवरचे मांडे तयार करून देत येथील काही महिलांनी यातून रोजगार शोधला आहे.

Traditional 'Manda' gave employment to women | चुलीवरच्या मांड्यांनी दिला महिलांना रोजगार

चुलीवरच्या मांड्यांनी दिला महिलांना रोजगार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : चुलीवरच्या जेवणाला एक न्यारी चव असते. आजच्या गॅसच्या जमान्यात चुलीवरचा स्वयंपाक तसा दूर्मीळ होवून बसल्याने अस्सल गावरान जेवण अनुभवण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला आहे. चुलीवरच्या भाकरी प्रमाणेच आता जिभेचे चोचले पुरवण्यासाठी, नेहमीपेक्षा वेगळे आणि काहीतरी हटके खायचे झाल्यास खवय्यांकडून मांडे या पदार्थास प्राधान्य दिल्या जात आहे. खवय्यांची रूची हेरून त्यांना मागणीनुसार चुलीवरचे मांडे तयार करून देत येथील काही महिलांनी यातून रोजगार शोधला आहे.
चुलीवर खापर ठेऊन भाजल्या जाणारी आणि अतिशय पातळ व नियमित पोळीपेक्षा चार पट जास्त मोठी अशी पोळी म्हणजेच मांडा, मांडे हे त्याचे अनेकवचनी नाव. मांडे प्रामुख्याने खान्देशात बनविल्या जातात. परंतू, तिकडे त्याचे स्वरूप पुरणपोळीप्रमाणे असते. आपल्या भागात प्रामुख्याने बंजारा समाजात यासारख्या पोळ्या बनविल्या जातात. ज्याला बंजारा बोली भाषेत ‘पातळी’ असे संबोधल्या जाते. अगदी याच पध्दतीचे परंतू थोड्या मोठ्या आकारातील मांडे बनवून देण्याचे काम सध्या चिखली येथील श्री शिवाजी उद्यानासमोर साधरणत: सहा ते सात महिला नियमितपणे करतात. उद्यानासमोर रस्त्याच्या कडेला चूल मांडून त्यावर एका मोठ्या मडक्याच्या खापरावर या महिला केवळ हातावरच मांडे बनवितात. सुरूवातील हे मांडे मैद्याचे असावेत असे वाटते पण ते तसे नाही. अगदी उत्तम प्रतिच्या गव्हाचे पीठ असेल तरच त्या बनविल्या जातात अशी माहिती जाधव नामक महिलेने दिली. दुपारी साधारण २ वाजेपासून या महिला येथे आवश्यक तिंबलेले पीठ व इतर साहित्य घेवून चूल मांडून बसतात ते रात्री साधारण दहा वाजेपर्यंत. १५ रूपयाला एक याप्रमाणे या महिलांकडून मांडे दिल्या जातात.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, सर्वजण गरीब घरातल्या, मोलमजुरी करून आपल्या कुटूंबाचा गाडा ओढण्यासाठी हातभार लावणाऱ्या. लग्न समारंभ व इतर प्रसंगात लागणाºया स्वयंपाकात पोळ्या बनवून देण्याचे काम करणाºया. मात्र, इतरवेळी हाताला काम मिळत नसल्याने त्यांनी ही कला अवगत केली आणि त्यातूनच रोजगार शोधला. सोमवार, गुरूवार, शनिवार हे वार वगळता इतर दिवसात त्यांना ग्राहकांचा बºयापैकी प्रतिसाद मिळतो. दिवसाला ५० ते ६० मांडे विकल्या जातात. त्यातील खर्च वजा करता ४०० ते ५०० रूपये या महिलांना एका दिवसाला मिळत असल्याने या व्यवसायातून या महिला आर्थिकदृष्ट्या देखील स्वयंपूर्ण होत आहेत. दरम्यान खवय्यासांठी मांडे बनवून देणाºया महिलांनी उपलब्ध करून दिलेली ही गरमा-गरम मेजवानी खवय्यांसाठी एक वेगळी पर्वनीच ठरते. त्यामुळे तुम्हाला मांडे खायचेत... चला तर मग चिखलीला..! (तालुका प्रतिनिधी)
येथे वसते अन्नलक्ष्मी
शहराने प्रत्येकच क्षेत्रात कायम आपले वेगळेपण जपले आहे. येथील खाद्यसंस्कृतीही यापैकी एक. खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत चिखली शहरात साक्षात अन्नलक्ष्मी वसते, असे म्हटल्या जाते. शहरात रात्री-बेरात्री कधीही जेवणाची सोय ही हमखास होतेच, अशी ख्याती सर्वदूर असल्याने कुठेच जेवणाची व्यवस्था झाली नाहीत तर बिनधास्तपणे शहराकडे धाव घेणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. अशांची भूक आणि चिभेचे चोचले पुरविण्याचे काम येथील हॉटेल्स्, स्ट्रीट फूडचे स्टॉल्स्, ढाबे या माध्यमातून होते.

Web Title: Traditional 'Manda' gave employment to women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.