वृक्ष गायब, उरले केवळ काट्यांचे फास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:26 PM2019-01-11T13:26:21+5:302019-01-11T13:27:08+5:30
खामगाव: तालुक्यातील विविक्ष क्षेत्रावरील सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड घोळ प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आल्याचे समजते.
- अनिल गवई
खामगाव: तालुक्यातील विविक्ष क्षेत्रावरील सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड घोळ प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी राज्य शासनाकडे दाखल तक्रारीची गंभीर दखल घेत, मुख्य वनसंरक्षक, अमरावती यांनी संबंधितांना तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. परिणामी, सामाजिक वनीकरण विभागात एकच खळबळ उडाल्याचे दिसून येते.
पर्यावरण रक्षणासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून खामगाव-शेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रांवरील रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीऐवजी काही ठिकाणी कागदोपत्री तर काही ठिकाणी लावण्यात आलेल्या वृक्षांची निगा राखण्यात आली नाही. परिणामी, शेलोडी, तिंत्रव, चिंचपूर, अटाळी, हिंगणा कारेगाव, जलंब, माटरगाव आदी क्षेत्रांवरील हजारो वृक्ष गायब आहेत. काही ठिकाणी ही वृक्ष करपली असून, अनेक ठिकाणी वृक्षांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेले केवळ काट्यांचे फास शिल्लक आहेत. सामाजिक वन मजुराच्या पुढाकारातून लक्षावधींचा घोळ करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर या वनमजूराविरोधात महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ या बेब पोर्टलवर तक्रार करण्यात आली. या तक्रारींच्या अनुषंगाने मुख्य वनसंरक्षक अमरावती यांनी विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग, बुलडाणा यांना पत्र देत, तक्रार अर्ज विहित कालमर्यादेमध्ये निकाली काढण्याचे निर्देश दिलेत. तसेच सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचेही सुचविले आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागात एकच खळबळ उडाली आहे..
मजूरा विरोधात गंभीर तक्रार!
खामगाव परिक्षेत्रातील मजूर विजय नामदेव पवार यांनी वरिष्ठांची मर्जी संपादीत करीत वृक्ष लागवड योजनेत भ्रष्टाचार केल्याची गंभीर तक्रार शासनाच्या आपले सरकार बेब पोर्टलसह, विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण बुलडाणा आणि मुख्य वनसंरक्षक अमरावती यांच्याकडे करण्यात आली. या तक्रारींच्या अनुषंगाने वृक्ष लागवड घोळाची उच्च स्तरीय चौकशी केली जात आहे.
‘लोकमत’वृत्तांची वनमंत्र्यांकडून दखल!
खामगाव तालुक्यातील वृक्ष लागवड घोळ ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. यासंदर्भात विविध वृत्तांची अर्थ तथा वनमंत्री ना. सुधीर मुनगुंटीवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे ‘लोकमत’वृत्तांच्या आधारेही खामगाव तालुक्यातील वृक्ष लागवड भ्रष्टाचाराची चौकशी केली जाणार असल्याची माहिती वनीकरण विभागाच्या एका बड्या अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
लक्षावधींच्या भ्रष्टाचाराच्या घोळावर शिक्कामोर्तब!
सामाजिक वनीकरण विभागातंर्गत खामगाव तालुक्यातील सुमारे ३० ते ३५ क्षेत्रांवरील रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष गायब आहेत. गायब असलेल्या वृक्षांची संख्या ही मोठी असल्याने, वृक्ष लागवड घोळ लक्षावधी रूपयांची धक्कादायक बाब सामाजिक वनीकरण विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीत समोर आल्याची धक्कादायक माहितीही पुढे आली आहे.