बसस्थानक परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. कार्यालयाच्या परिसरात इतर वृक्षासह सुमारे ५० वर्षांपूर्वीचे लिंबाचे मोठे झाड होते. कार्यालयासमोरच शहरातील सिव्हील कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री संततधार पावसामुळे हे झाड मुळासकट उन्मळून रस्त्यावर पडले. या रस्त्याने नियमित वर्दळ असते. परंतु सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने जीवितहानी झाली नाही. परंतु लगत असलेल्या महावितरणच्या विद्युत खांबावर पडले आणि तारा तुटल्या. कार्यालयाच्या शेजारी असलेल्या शेख जहीर आणि शेख कदीर यांचे ऑटो पार्ट आणि गॅरेज दुकानाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन वित्तहानी झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे या घटनेचा कसल्याही प्रकारचा पंचनामा न करता बागवान नामक लाकडाच्या व्यापाऱ्याने झाडाची कटाई करून वृक्षाची सर्व लाकडे विनामूल्य गाडीमध्ये भरून नेली. त्यामुळे, परिसरामध्ये शासकीय कार्यालयाच्या प्रांगणातील झाड विनामूल्य कसे? यासंदर्भात कार्यालय परिसरातील व्यावसायिकासह शहरांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
मुख्य रस्त्यावर झाड कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:41 AM