ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:54 AM2017-11-10T00:54:35+5:302017-11-10T00:55:00+5:30
मोताळा : भरधाव आयशरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा अकोला येथील खासगी रुग्णालयात उ पचारादरम्यान गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : भरधाव आयशरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा अकोला येथील खासगी रुग्णालयात उ पचारादरम्यान गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला.
मोताळा-नांदुरा मार्गावरील वरुड फाट्यानजीक बुधवारी ८ नोव्हेंबरच्या सायंकाळी हा अपघात घडला होता. विलास रामभाऊ कोकाटे (४५, रा. पळशी सुपो) असे त्याचे नाव आहे. तुषार हरिश्चंद्र कोकाटे (४५, रा. पळशी सुपो ता. जळगाव जामोद) यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनला या प्रकरणी फिर्याद दिली. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, विलास रामभाऊ कोकाटे हा दुचाकी क्रमांक एम. एच. २८ वाय. ७९२७ ने नांदुर्याकडून मो ताळय़ाकडे येत असताना, वरुड फाट्यानजीक आयशर क्रमांक एम.एच. ४३ यु. २५८२ च्या चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून विलास कोकाटे यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात विलास कोकाटे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी बुलडाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. त्याठिकाणी उपचारादरम्यान गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी तुषार कोकाटे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आयशर चालक गोविंदा भास्कर नारखेडे (३१, रा. बोराखेडी ता. मोताळा) याच्याविरूद्ध कलम २७९, ३0४ (अ) भादंविनुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस नायक सुनील हिवाळे करीत आहेत.
दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून, ३ नोव्हेंबर रोजी २४ तासात सात व्यक्ती जिल्ह्यात रस्ते अपघातात मृत्यू पावले होते.