लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : संकांती$निमित्त वाटण्यात येणाऱ्या वाणात तुळशीचे रोपटे भेट देऊन पर्यावरणपूरक सण-उत्सव साजरा करण्याचा संदेश येथील महिलांनी दिला. तुळशीचे रोप सतत आॅक्सिजनचा पुरवठा करणारे असल्याने या रोपट्याची निवड केल्याची माहिती त्यांनी दिली. अशाप्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. मकर संक्रातीनिमित्त विद्यानिकेतन बहुउद्देशिय संस्था व योगांजली योगवर्गाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. सडा व रांगोळी घालून अंगण सजविण्यात आले होते. तोरण, पतंग व समईच्या सुंदर आरासने सभागृह सजविण्यात आले होते. यावेळी माणिक भावे, सिमा ठोसर, अंजली परांजपे, अरुणा महाजन, दुर्गा पायगव्हाण, नेहा अग्रवाल, सपना अग्रवाल, माया महाजन, हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सध्या प्रदुषाणाची मोठी समस्या निर्माण झाल्याने पर्यावरण पूरक उपक्रमाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच एक वेगळा पायंडा पाडत योगांजली योगवर्गाच्यावतीने आयोजित विशेष उपक्रमामध्ये वाणात आॅक्सिजनचा सतत पुरवठा करणारे तुळशी रोप वाटल्या जाणार असल्याचे अंजली परांजपे यांनी आपल्या मनोगतात सांगीतले. यावेळी माणिक भावे म्हणाल्या की, सकाळी मकरसक्रांतीचे हळदीकुंकू व तुळशीच्या रोपांचे वाण हा एक स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम आहे. भल्या पहाटे या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी महिला उपस्थित होत्या. तिळगुळ व वाण वितरणानंतर महिलांमधे उखाणा घेण्याची मैफील रंगली. या कार्यक्रमाचे संचालन संध्या महाजन यांनी केले. आभार गिता नागपुरे यांनी मानले. यावेळी सविता बेदरकर, डॉ. अग्रवाल, वर्षा जैन, स्मिता अग्रवाल, श्रेया परांजपे यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
संक्रांतीच्या वाणात दिले तुळशीचे रोपटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 3:01 PM