लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या टॉवर गार्डन समोरच चक्क गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे शहरातील नाले सफाईचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते.
शहरातील मुख्य रस्त्यावर पालिकेचा टॉवर गार्डन आहे. या गार्डनसमोर मोठ्याप्रमाणात खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने आहेत. टॉवर गार्डन जवळ ही दुकाने थाटण्यासाठी तसेच टॉवर गार्डन समोरील व्यावसायिकांनी आपल्या आवारात येवू नये, यासाठी पालिकेची नाली बुजविण्यात आली आहे. ही नाली बुजविण्यासाठी सिमेंटच्या बॅगचा वापर करण्यात आला. परिणामी पावसाचे पाणी जाण्यासाठी वहिवाट नसल्याने, टॉवर गार्डन जवळ चक्क गुडघाभर पाणी साचले आहे. साचलेले पाणी मुख्य रस्त्यावरूनही वाहते. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाºयांना तसेच वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टॉवर गार्डन समोरील ८०० एमएम व्यासाचा पाईप बुजविण्यात आल्याने, पावसाचे तसेच सांडपाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाली आहे. हा पाईप मोकळा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस गंभीर समस्या धारण करीत आहे. ऐन टॉवर गार्डन समोर पाणी तुंबल्यामुळे शहराचे वैभव असलेला टॉवर गार्डनच समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाणी तुंबल्यानंतरही याकडे पालिका प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे.
शासकीय जागेवर बसविले पेवर्स!
नालीचे पाणी टॉवर गार्डन समोरील भागात येवू नये, यासाठी या भागातील व्यावसायिक तसेच नागरिकांनी ८०० एम.एम. पाईप बुजविला आहे. तर दुसºया बाजूने टॉवर गार्डन नजीक विक्रेत्यांनी नाली बुजविली आहे. त्यामुळे टॉवर गार्डन आणि रस्त्यावर पाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाली आहे. काही वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांनी तसेच व्यावसायिकांनी पाईप बुजविण्यासाठी पाईपच्या तोंडासमोर पेवर्स बसविले आहेत. त्यामुळे अर्धापाईप झाला गेला असून, पाण्याची नैसर्गिक वहिवाट बंद करण्यासाठीही या नागरिकांनी विविध कृलुप्त्या शोधून काढल्या आहेत.
पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष!
शहरातील अतिक्रमणाप्रमाणेच नाल्या बंद करणाºया आणि मोठ्या नाल्यांमध्ये पक्केबांधकाम करणाºयांकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. शहरातील मान्सूनपूर्व नाले सफाईचे नियोजन करतानाही पालिका प्रशासनाकडून या गंभीर बाबीची दखल घेतली जात नाही. परिणामी, शहरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.