चिखली/साखरखेर्डा/ बिबी : जिल्ह्यात गेल्या २४ तासात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोन जण ठार झाले असून १५ जण जखमी झाले आहेत. साखरखेर्डा येथे शुक्रवारी रात्री अपघात होऊन एक जण ठार झाला तर बिबी येथे सायंकाळी मालवाहू जीप आणि दुचाकीची धडक होऊन एक जण ठार झाला तर मृतकाची आई जखमी झाली. तिस-या घटनेत चिखली शहरानजीक मेहकर फाट्यावर बसचा स्टेअरिंग रॉड तूटून नियंत्रण सुटलेल्या बसला अपघात झाला. त्यात बसमधील १४ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. या जखमीमध्ये वाशिम, यवतमाळ आणि जालना जिल्ह्यातील काही प्रवाशांचा समावेश आहे.
चिखली : बुलडाणाहून लोणारकडे जाणाºया राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा-लोणार या बसचे स्टेअरींग रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात उतरली व झाडाच्या खोडाला जावून धडकली. या अपघातात १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना ३० डिसेंबर रोजी चिखली-मेहकर मार्गावरील सहारा पार्कनजीक दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातील जखमींना स्थानिक ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बुलडाणा आगाराची एमएच-४०-वाय-५७९८ क्रमांची बस बुलडाणाहून लोणारला जात असताना चिखलीपासून थोड्याच अंतरावर मेहकर मार्गावरील सहारा पार्क नजिक या बसचे स्टेअरींग रॉड तुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरली. रूंदीकरणाअंतर्गत रस्त्याच्या कडेला खोदकाम केलेले असल्याने बस खोल खड्ड्यात उतरली व एका मोठ्या झाडाच्या खोडाला जावून धडकली. यामुळे या बसमधील १४ प्रवासी जखमी झाले आहेत. याबसमध्ये एकूण ३७ प्रवासी होते. यातील विश्वनाथ गणेश जाधव (२३ रा.गांधारी, ता.लोणार), हर्षल संजय चव्हाण ( १९ रा.गांधारी), रामेश्वर भगवान विधाते (३२ रा.गडते पांग्रा ता.मंठा), राजु आनंदराव चव्हाण (४६ रा.लोणार), शोभा भगवान चौधरी (६० रा.मेहकर), प्राजक्ता आनंद खंडाळकर (२६), आनंद दिलीप खंडाळकर ( २९, रा.गणेशपेठ वाशिम), विनोद माणिकराव गरकल (३९ रा.रिसोड), बाळू दत्ता भांगे (४४ रा.महागाव जि.यवतमाळ), डिंगबर चंद्रनाथ सुरोशे (५१ रा.धोसकी, ता. उमरखेड), रासाजी तुकाराम टोले (४०, रा.लिमटोक ता.कळमनुरी), शिवाजी संतोष सरकटे (५०, रा.तळणी ता.मंठा), गौरव अशोक मोरे (२० रा.लोणार), सुनील भगवान विधाते (२८, रा.गादे पांग्री), गर्भवती महिला सखाबाई परमेश्वर जारे (रा.टेंभुर्णा) हे प्रवासी जखमी झाले असून यातील अनेकांना मुका मार लागला. त्यांना स्थानिक ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या अपघातामध्ये बसचालक राजू किसन शेळके (रा. शिरपूर) हा देखील किरकोळ जखमी झाला होता.
दुचाकी अपघातामध्ये साखरखेर्ड्यातील युवक ठारसाखरखेर्डा: चिखली येथून परत येत असतांना भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने इरफानखा आरिफखा पठाण (३०,) हा युवक ठार झाला आहे. ही घटना २९ डिसेंबरच्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास साखरखेर्ड्यानजीक घडली. साखरखेर्डा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य आरिफखा पठाण यांचा होलसेल कटलरीचा व्यवसाय असून दररोज चिखली येथे व्यवसाय निमित्त इरफानखा यांचे येणे जाणे होते. शुक्रवारी चिखली येथून परत येत असताना साखरखेर्डा-लव्हाळा रोडवर भुयारी शिवारात एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने इरफानखा पठाण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी चिखली येथे हलविले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शनिवारी दुपारी १२ वाजता मुस्लीम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवाचा दफनविधी करण्यात आला.
मालवाहू जीप व दुचाकीच्या अपघातात एक ठारबिबी : स्थानिक वसंतराव नाईक विद्यालयाजवळ दुचाकी आणि मालवाहू जीपची धडक होऊन सोमठाणा येथील प्रशांत संजय शिंदे (२१) याचा शनिवारी सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला. त्यांच्या आईला घेऊन ते आठवडी बाजर करून बिबी येथून दुचाकीवर घराकडे जात होते. त्यावेळी मालवाहू जीपने पुढे जाण्याच्या प्रयत्नात त्यांना जबर धडक दिली. त्यात प्रशांत शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या जखमी आईला सानप हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले आहे. घटनास्थळापासून बिबी पोलिस स्टेशन हे हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे ठाणेदारांनी लगोलग नाकाबंदी करून पोलिस वाहनाद्वारे पाठलाग करत अपघात करणार्यास चोरपांग्रा शिवारात पकडले. यावेळी त्यांच्या समवेत पीएसआय महाडिक, टेकाळे, नागरे आणि परसूवाले हे पोलिस कर्मचारीही होते.