दोन किलोमीटरच्या रस्त्याला दुरुस्तीची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:23 AM2021-07-04T04:23:38+5:302021-07-04T04:23:38+5:30
मराठवाड्याच्या हद्दीत असलेला व विदर्भातील सिंदखेडराजा आणि पूर्वेला तळणी मार्गे लोणार, लोणी, रिसोडला जोडणारा हा रस्ता महत्त्वाचा आहे. ...
मराठवाड्याच्या हद्दीत असलेला व विदर्भातील सिंदखेडराजा आणि पूर्वेला तळणी मार्गे लोणार, लोणी, रिसोडला जोडणारा हा रस्ता महत्त्वाचा आहे. अनेक छोटी गावे, वाडी, तांड्यांना या मार्गामुळे बस सेवा उपलब्ध आहे; परंतु बेलोरा पाटी ते चंगेफळ हद्द असा दोन किमी रस्ता अत्यंत खराब आहे. नाल्यावर पूल नसल्याने लोणारकडून या मार्गे असणारी बस सेवा पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. गेली अनेक वर्षे प्रतीक्षा करूनही केवळ दोन किमी रस्ता प्रशासनाला दुरुस्त करता आलेला नाही. राजकीय अनास्थेमुळे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी चांगेफळ ग्रामस्थांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, आज ही या रस्त्याला दुरुस्तीची प्रतीक्षा आहे.
मुख्य रस्ता बंद असल्याने वाहतुकीला अडथळा
सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी येथील पुलाचे काम सुरू असल्याने पुढील सहा महिने हा मुख्य रस्ता बंद असणार आहे. मेहकर, लोणारकडून सिंदखेडराजा मार्गे जाणाऱ्या काही बस सध्या लोणार, तळणी, बेलोरा, वझर सरकते या मार्गे याच दोन किलोमीटर खराब रस्त्याने येत आहेत. मात्र, पाऊस जास्त झाल्यास हा मार्ग बंद होणार आहे. त्यामुळे या दोन किलोमीटर रस्त्याचे काम तातडीने होणे गरजेचे आहे.