चिखली : तालुक्यातील गांगलगाव येथे लांडग्याने हल्ला चढवून एका ९ वर्षीय चिमुरडीसह ४0 वर्षीय इसमास चावा घेतल्याने दोघेजण जखमी झाल्याची घटना २ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास घडली. लांडग्याच्या हल्ल्यातील जखमींना तातडीने स्थानिक ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.गांगलगाव येथील सुधाकर हिरामन कपाटे वय ४0 वष्रे हे पहाटे ६ वाजेच्या सुमारास कवठळ रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या लांडग्याने त्यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. यामध्ये लांडग्याने कपाटे यांच्या डोक्याचा चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान हा प्रकार इतर ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने ते कपाटे यांच्या मदतीसाठी येताच लांडग्याने तेथून पळ काढला. मात्र या दरम्यान घरासमोर खेळत असलेल्या ९ वर्षीय कु.मयुरी बबनराव धंदर या चिमुरडीवर त्याने हल्ला करून मयुरीच्या पाठीला चावा घेतल्याने मोठय़ा जखमा झाल्या आहेत. याशिवाय लांडग्याने गावातील संतोष आत्माराम सावळे यांच्या दोन वासरांवरही केला आहे. लांडग्याच्या या हल्ल्यात जखमी झालेल्या सुधाकर कपाटे व मयुरी धंदर यांना प्रभाकर कपाटे, शिवा म्हस्के, गणेश म्हस्के, राजू म्हस्के, लताबाई म्हस्के यांनी तातडीने स्थानिक ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र नेहमीप्रमाणे ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे सकाळी साडेसातच्या सुमारास रूग्णालयात दाखल झालेल्या जखमींना साडेदहा वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागले. जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होत असल्यामुळे अनेक वन्यप्राणी शहराकडे धाव घेत आहेत. सध्या वनकर्मचार्यांचा संप सुरू असल्यामुळे जंगलाकडे लक्ष देणे कमी झाले आहे. त्यामुळे वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात होत आहे.
लांडग्याच्या हल्ल्यात दोन गंभीर जखमी
By admin | Published: September 02, 2014 10:58 PM