दुसरबीड: नागपुर-मुंबई महामार्गाला लागूनच असलेल्या एका विहीरीत तीन वर्षाची मुलगी व एक वर्षाच्या मुलासह विहीरीत उडी घेतलेल्या महिलेस महामार्गावर जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांसह अन्य दोघे अशा चार जणांनी वाचविल्याची घटना सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथे १३ फेब्रुवारी रोजी घडली.
सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड हे गाव नागपूर-मुंबई महामार्गालगतच आहे. या महामार्गालगतच गावाची पाणीपुरवठ्याची विहीर आहे. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी एक महिला तिच्या अपत्यांसह या विहीरीत कथितस्तरावर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी घेत असल्याचे या मार्गावरून जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांनी पाहिले. त्यामुळे या दोघांनीही लगोलग त्यांची दुचाकी थांबवून विहीरीकडे धाव घेतली. लगेच विहीरीत त्यांनी उड्या मारून ३३ वर्षीय महिला व तिची तीन वर्षाची मुलगी व एक वर्षाच्या मुलालाही अन्य दोघांच्या सहकाऱ्याने विहीरीतून बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले. या तिघांनाही लगोलग स्थानिक एका खासगी रुग्णालयात उपाचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान यातील एक वर्षाच्या चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास प्रथम जालना येथे व तेथून अैारंगाबाद येथे हलविण्यात आले असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच किनगावराजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ पवार, दुय्यम ठाणेदार भाईदास माळी व अन्य पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, महिलेे असे धाडस का केले? याबाबत मात्र स्पष्टता मिळू शकली नाही.
--यांनी वाचविले प्राण--देऊळगावराजा येथे बाजारासाठी जात असलेले वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाकद येथील रशीद करीम कुरेशी व सोनाटी बोरी येथील अनंता वामन चनखोरे या दोघांसह विजय राजणे, राम खंदारे, सागर देशमुख यांनी विहीरीतून महिलेस तिच्या दोन मुलाना काढले. वेळीच समय सुचकता राखत या चौघांनी केलेल्या मदतीमुळे या तिघांचे प्राण वाचविण्यात यश आले. समय सुचकता दाखवत रशीद कुरेशी, अनंता चनखोरे यांनी महिलेसह तिच्या दोन अपत्यांचा जीव वाचविल्याबद्दल दुसरबीड येथील सरपंच पती प्रकाश सांगळे, उपसरपंच पती तौफीक शेख यांचा सत्कार केला.