लोकमत न्यूज नेटवर्कपळशी बु.: जवळच असलेल्या उमरा (लासुरा) येथील पालकांनी शिक्षण विभागाकडे वारंवार शिक्षकांची मागणी केली; मात्र यंदाचे सत्र संपत असले, तरी या शाळेला शिक्षक न दिल्याने गावातील सर्व पालकांनी ३१ जानेवारीपासून आपल्या मुलांना शाळेत पाठविणे बंद केले.बुलडाणा व अकोला या जिल्ह्याच्या सीमेवर मस नदीच्या काठावर येत असलेल्या उमरा (लासुरा) ता. खामगाव या गावाची लोकसंख्या चारशेच्या आसपास आहे. येथे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा असून, या शाळेचे १ ते ४ असे वर्ग आहेत. वर्ग पहिलीमध्ये चार मुली, चार मुले, वर्ग दुसरीमध्ये तीन मुली, चार मुले, वर्ग तिसरीमध्ये सात मुली, तर वर्ग चौथीमध्ये तीन मुली, सहा मुले असे एकूण १७ मुली व १४ मुले असे एकूण ३१ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. गेल्या २0१६-१७ या सत्रात या शाळेवर प्रभारी मुख्याध्यापक धीरज ठाकरे व शिक्षक एस.जी. पांढरे असे दोन शिक्षक होते; मात्र १0 जानेवारी २0१७ रोजी एस.जी. पांढरे या शिक्षकांची उमरा (लासुरा) या शाळेवरून कवळगाव येथील शाळेवर बदली झाली. तेव्हापासून उमरा येथील शाळेवर शिक्षक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे गावातील पालक व शाळा व्यवस्थापन समितीने लक्षात घेऊन गेल्या २४ नोव्हेंबर २0१७ रोजी गटविकास अधिकारी खामगाव यांना निवेदन देण्यात आले. या शाळेवर एक शिक्षक देण्यात यावा, अशी मागणी केली; मात्र प्रशासनाकडून मागणीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे पालकांनी एकत्र येऊन आता आपल्या मुलांना शाळेतच पाठवायचे नाही, असा निर्णय घेऊन ३१ जानेवारीपासून येथील पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. दरम्यान, एका आठवड्यात शिक्षक मिळाला नाही, तर उमरा येथील विद्यार्थ्यांची शाळा ही खामगाव पंचायत समितीच्या प्रांगणात भरवणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
३१ जानेवारीपासून शाळेत एकही विद्यार्थी आला नाही. याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पालकांना विचारणा केली असता, शिक्षक मिळेपर्यंत आम्ही मुलांना शाळेत पाठविणार नाही, असे उत्तर पालकांकडून दिल्या जात आहे.- धीरज ठाकरे,प्रभारी मुख्याध्यापक म.प्रा. शाळा उमरा (लासुरा)
येथील एका शिक्षकांची गेल्या सव्वा वर्षापासून बदली झाली; मात्र त्यांच्या जागी आजपावेतो येथे दुसरा शिक्षक मिळाला नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने दुसरा शिक्षक मिळेपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठविणार नाही. - प्रकाश श्रीरंग दांडगे,पालक उमरा (लासुरा)