लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ‘वाघांचा पूर्व विदर्भातील अधिवास आणि स्थलांतर’, हा मुद्दा घेऊन वाईल्ड लाईफ इन्स्टीट्युट आॅफ इंडीया आणि महाराष्ट्र वन विभागाने चार वर्षापासून सुरू केलेल्या अभ्यासाचे वन संवर्धनाच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम समोर येण्याची शक्यता आहे. प्राण्यांचे भ्रमण आणि महामार्गावरील कुठल्या टप्प्यातून ते रस्ता क्रॉस करतात, याचाही अभ्यास यात झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अपघातांमधील वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता अशा ठिकाणी महामार्गावर उपाययोजना करणे सोपे जाणार आहे.त्यानुषंगाने मधल्या काळात ब्रम्हपुरी टायगर कॉरिडारमध्ये झालेला अभ्यास उपयुक्त ठरला आहे. या अभ्यासामुळे नागपूर-मूल या फोर लेन मार्गावर वाघासह वन्य प्राणी नेमक्या कोणत्या जागेवरून हा रस्ता ओलांडतात त्याची स्थळ निश्चितीही करणे शक्य झाले असल्याचे वाईल्ड लाईफ इन्स्टीट्यूट आॅफ इंडियाचे सिनियर बायोलॉजीस्ट अबिदुल हुसेन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या संदर्भात होणाऱ्या दुर्घटना या भागात टाळण्यासाठी जवळपास चार उड्डाणपूल उभारण्याच्या सुचनाही या अभ्यासाठी प्रशासनास करण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले.वाघांचा पूर्व विदर्भातील अधिवास आणि स्थलांतर या मुद्द्याचा सर्वंकष अभ्यास करताना प्रामुख्याने सब अॅडल्ट वाघांची निवड करण्यात येऊन त्यांना रेडीओ कॉलर आयडी लावण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणामही समोर येत आहे.यामधून मोठ्या प्रमाणावर वाघांच्या हालचाली, सवयी याचा मोठा डेटा वनविभागाला उपलब्ध झाला आहे. प्रामुख्याने सब अॅडल्ट वाघ हे साधारणत: १५ महिन्याचे झाल्यानंतर ते स्वत:चा स्वतंत्र अधिवास शोधण्यासाठी आईपासून वेगळे होतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास करणे सोपे जाते या दृष्टीकोणातूनच टिपेश्वरमधील टी-१ वाघीणीच्या पिल्लांना रेडीओ कॉलर बसविण्यात आली होती. अभ्यासाचा उद्देश पूर्ण झाल्यानंतर रिमोटच्या सहाय्याने आपोआप ही रेडीओ कॉलर वाघाच्या गळ््यातून गळून पडले, असेही अबिदूल हुसेन यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
वन्य प्राण्यांचे अपघात टाळण्यासाठी वाघांचा अभ्यास ठरणार उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 3:19 PM