योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : डॉक्टरांची रिक्त पदे व नादुरुस्त सिटीस्कॅन मशीनमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाला ‘रेफर टु’ चे ग्रहण लागले होते. आता येथील रिक्त पदे भरण्यात आली असून सिटीस्कॅन मशीनही नवीन बसविण्यात आलीे आहे. त्यामुळे हे ग्रहण आता काही अंशी सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातून विविध आजारांचे रुग्ण उपचारासाठी येत असतात. याआधी येथे तज्ज्ञ डॉक्टरांची विविध पदे रिक्त होती. सिटीस्कॅन मशीनही नादुरुस्त होती. तसेच गायनाकोलॉजीस्ट डॉक्टरांचाही अभाव होता. त्यामुळे बऱ्याच वेळा अपघाताच्या प्रकरणातील तसेच प्रसुतीसाठी महिलांना अकोला किंवा औरंगाबाद येथे रेफर केले जात होते. मात्र आता सर्व तज्ञांची पदे भरली असून सिटीस्कॅन मशीनही नवीन बसविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाण अतिशय नगण्य झाल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. अपघातामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांवर देखील आता योग्य वेळी उपचार केल्या जात आहेत. त्यामुळे अनेक अपघातग्रतांचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. अपघाताच्या घटनांमधील रुग्णांना रेफर करण्याची गरज भासणार नाही यादृष्टीने सबंधित डॉक्टर पूर्णपणे प्रयत्नरत असल्याचे वास्तव आहे.सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या ३० पर्यंत पोहचली आहे. रिक्त पदे भरण्यापूर्वी संपूर्ण रुग्णसेवेचा भार केवळ १६ डॉक्टरांवर होता. यामुळे रुग्णांना योग्य ती सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. परंतु यामध्ये आता हळहळू बदल व्हायला सुरूवात झाली असून रुग्णांना उत्कृष्ट सेवा मिळत आहे.अकोला येथील आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी यांनी या प्रकाराची दखल घेवून जिल्हा सामान्य रुग्णालयात सुविधांची उपलब्धता करून देण्यात यावी अशी मागणी रुग्णांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनी येथील समस्यांचा पाठपुरावा करण्याची गरज आहे.
ग्रामीण रुग्णालयांचाही दर्जा सुधारलाजिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांसह उपजिल्हा रुग्णालयांचा दर्जाही सुधारला आहे. शेगाव, मेहकर, चिखली व मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये याआधी सिझरची व्यवस्था नव्हती. यामुळे प्रसुतीकरीता आलेल्या महिलांना इतरत्र रेफर करावे लागत होते. परंतु आता येथे सर्जन व गायनाकोलॉजीस्टची पदे भरल्याने सीझरसाठी महिलांना जिल्हास्तरावर किंवा इतरत्र रेफर करण्याची आवश्यकता भासत नाही.जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्हाभरातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अतिशय उत्तम रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वच ठिकाणी डॉक्टरांच्या रिक्त पदांची पुर्तता करण्यात आली आहे. रुग्णांनी या ठिकाणी उपचारासाठी येऊन या सुविधेचा लाभ घ्यावा.- डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा शल्य चिकित्सक