वीरशैवांच्या भक्ती मेळ्यात वैष्णवांचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:22 AM2021-07-22T04:22:04+5:302021-07-22T04:22:04+5:30
साखरखेर्डा : कोरोना संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण व्हावे म्हणून पंढरीची वारी सलग दुसऱ्या वर्षीही झाली नाही़ पंढरीला जाता ...
साखरखेर्डा : कोरोना संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण व्हावे म्हणून पंढरीची वारी सलग दुसऱ्या वर्षीही झाली नाही़ पंढरीला जाता आले, नसले तरी आषाढी एकादशीला गावातील विठ्ठलाचे दर्शन घेऊन वारकरी भाविकांनी येथेच डोळे भरून पांडुरंग पाहिला. साखरखेर्डा गाव महास्वामी श्री पलसिध्द महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी असून त्यांच्याच शिष्याने साखरखेर्डा नगरीत विठ्ठल-रुख्माई यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून वीरशैवाच्या भूमीत वैष्णवांचा मेळा असेच काहीसे चित्र पाहावयास मिळते.
साखरखेर्डा गावाचा इतिहास हा पुरातन असून अनेक खाणाखुणा त्यांची साक्ष देतात. एक हजार वर्षांपूर्वीचा पलसिंध्द महाराज यांचा मठ हा त्याचा साक्षीदार आहे. वीरशैव लिंगायत संप्रदाय या गावात वतनदार म्हणून कारभार पाहात होते. गुणाप्पा सखाराम अप्पा बेंदाडे एक जमीनदार म्हणून १८व्या शतकात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या घराण्यात वीरशैव धर्म पताका जरी असली तरी ते विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. दर एकादशीला उपवास, भजन, कीर्तन असा भक्तिमय सोहळा होत होता. त्याच कालखंडात त्यांनी विठ्ठल-रुख्माईची प्राणप्रतिष्ठा करून गावातील भक्तांसाठी आपले निवासस्थान एक मंदिर म्हणून खुले केले. त्यांच्या पश्चात मार्तंड अप्पा यांनी वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे चालू ठेवला. पंढरपूरची वारी म्हणजे त्यांचा नित्यक्रम असायचा. तो वारसा २९व्या शतकात श्रीराम अप्पा बेंदाडे यांनी सुरू ठेवला. त्यांच्या पश्चात शामराव बेंदाडे, सुधीर अप्पा बेंदाडे आणि शशिकांत बेंदाडे यांनी सुरू ठेवून आषाढी एकादशीला महापूजा, आरती, महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. धर्म, संप्रदाय कोणताही असला तरी भक्तिभाव असला पाहिजे, अशी प्रचिती त्यांनी दाखवून दिली. दरवर्षी आषाढी एकादशीला अख्यगाव आणि परिसरातील नागरिकांच्या भक्तिभावाने वाहून जाते. मंगळवारी शशिकांत अप्पा बेंदाडे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून खुले करण्यात आले हाेते़