दुसरबीड : सिंदखेड राजा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने केवळ शोभेची वस्तू बनले आहेत. अनेक रुग्णालयांत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे पशुपालकांना आपल्या गुरांवर उपचार करण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.
सिंदखेड राजा तालुक्यातील अनेक पशुवैद्यकीय रुग्णालये बंद असल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत. दुसरबीड येथील पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये पशुधन अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. या रुग्णालयात औषधांचाही तुटवडा असल्याने पशुपालकांना आपल्या गुरांवर खासगी पशुधन अधिकाऱ्यांकडून उपचार करून घ्यावे लागत आहेत. खासगी पशुवैद्यकीय अधिकारी पशुपालकाकंडून ३०० रुपये घेत आहेत. कृत्रिम रेतन करण्याकरितासुद्धा दोनशे रुपये द्यावे लागत आहेत. शासनाने मागे पशूचा सर्व्हे केला. आधार नोंदणी खासगी लोकांकडून करून घेण्यात आली. त्यासाठी प्रत्येकी पन्नास रुपये फी द्यावी लागली. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री पशू स्वास्थ्य योजनेंतर्गत लाखो रुपये खर्च केले व पशुवैद्यकीय विभागाला फिरत्या दवाखान्याकरिता व लोकांना आपल्या जनावरांना योग्य उपचार मिळावा याकरिता एक व्हॅन दिली आहे; परंतु ही व्हॅन एका जागेवर धूळ खात पडून असून, याचा कोणताही उपयोग झाला नाही. रिक्त पदांसह सुविधांचीही वानवा असल्याने दुसरबीडसह सिंदखेड राजा तालुक्यातील पशुवैद्यकीय रुग्णालये शाेभेची वस्तू बनल्याचे चित्र आहे.