मानवी संवेदना दृढ करण्यासाठी विवेकानंद विचार साहित्य संमेलन - गोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 01:49 AM2018-01-01T01:49:02+5:302018-01-01T01:49:30+5:30
मानवी संवेदना अधिक दृढ करून त्यांच्या एकात्मतेचा विचार आम्ही समाजाच्या नसानसात भिनविण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम: स्वामी विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त हिवरा आश्रम येथे आयोजित विवेकानंद विचार साहित्य संमेलन हे आगळे-वेगळे विचार संमेलन राहणार आहे. विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांना नवसमाज निर्मितीसाठी, राष्ट्र उभारणीसाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कसे प्रसारित करता येईल, हा उद्देश या संमेलनातून साधणे अपेक्षित आहे. मानवी संवेदना अधिक दृढ करून त्यांच्या एकात्मतेचा विचार आम्ही समाजाच्या नसानसात भिनविण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
सहा ते ८ जानेवारीदरम्यान होत असलेल्या स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाच्या पृष्ठभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांची उपस्थिती होती. गोरे म्हणाले की, निष्काम कर्मयोगी शुकदास महाराज या विरक्त संन्याशाने मानवसेवेसाठी विवेकानंदांच्या विचारांची अगदी गावकुसातून पेरणी केली. आयुष्यभर त्या विचारांचे जागरण केले.
आगळे-वेगळे संमेलन
विवेकानंद विचार साहित्य संमेलन हे आगळे-वेगळे आहे. निव्वळ औपचारिकतेच्या परंपरेला फाटा देणारे हे संमेलन असून, त्यात अध्यक्षपदासाठी घोडेबाजार नसेल. संमेलनस्थळावरून वादही नसेल. पंचतारांकित व्यवस्थेसाठी सारस्वतांची एकमेकांवर चिखलफेकही नसेल. संमेलनाच्या पवित्र व्यासपीठावर राजकीय पुढार्यांचा वावरही नसेल, असे गोरे म्हणाले.