हिवरा आश्रम : विवेकानंदांनी पाश्चिमात्य देशात केलेले धर्मविवेचन अत्यंत मूलगामी तसेच परखड स्वरूपाचे होते. धर्म म्हणजे सेवा होय. दीन, दुःखी,पीडित यांच्यासाठी केवळ कळवळा नको, तर त्यांचे दुःख निवारण्यासाठी पुढे येणे होय. धर्माच्या चुकीच्या अन्वयार्थाने माणसात दुरावा निर्माण होत असेल, बाह्य चालीरीतीने कलह वाढत असतील व मानव त्यांच्या भक्ष्यस्थानी असेल, तर अस्तित्वात असलेल्या धर्माव्यतिरिक्त विश्वधर्माची स्थापना करूया म्हणजे धर्म कलह थांबतील. हा स्वामीजींचा विचार केवळ मानव समाजाच्या अभ्युदयासाठी, त्यांच्या सुखासाठी असलेला मानवतेचा परमोच्च बिंदू होय, असे विचार विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष तथा गीतेचे तत्त्वचिंतक आर. बी. मालपाणी यांनी केले. विवेकानंद जयंती महोत्सवाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शुकदास महाराजांनी केलेली विवेकानंद आश्रमाची स्थापना हा स्वामीजींच्या विचारांचे कृतिशील प्रगटीकरण आहे, असेही ते म्हणाले. शासनाच्या परवानगीने मर्यादित लाेकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. महापंगत, यात्रा, शोभायात्रा, मिरवणूक, आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तरी व्यासपीठावरून होणारे कार्यक्रम लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचविले जातील. २, ३, ४ फेब्रुवारीला आश्रमात ज्ञान, विज्ञान प्रबोधनाचा यज्ञ प्रज्वलित होऊन त्याची परिमाणकारिता सर्वदूरपर्यंत जाणवेल अशी मला आशा आहे. उत्सवाची महापंगत ही सामूहिक शक्तीचे विराट दर्शन असते. भेदाभेद विसरून अवघा समाज एकत्रित येणे व एकमेकांना प्रसाद भरविणे या परमोच्च क्षणासाठी महापुरुषांनी, संस्थापकांनी अहोरात्र प्रयत्न केले. काही काळ का होईना जगण्याच्या त्या भावस्थितीत आपण जात असतो. यावर्षी मात्र आपण प्रत्येकाने आपल्या घरीच प्रसाद बनवून एकमेकांना भरवूया, कुटुंबातील सगळ्यांनी एकमेकांना या सुखाची अनुभूती देऊया. जयंती उत्सवाचे व्यासपीठावरून होणारे कार्यक्रम अत्यंत दर्जेदार व ख्यातिकीर्त मान्यवरांचे प्रबोधन आहे. त्यांचा लाभही केबल नेटवर्क, युटूब, फेसबुक, आदींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली आहे, ही सर्व तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.