‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 03:44 PM2019-03-31T15:44:37+5:302019-03-31T15:45:01+5:30
जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सुमारे दीड हजार शाळांमधून चुनाव पाठशाळेच्या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये जाणीव जागृती करण्याच्या दृष्टीने बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. शन्मुगराजन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सुमारे दीड हजार शाळांमधून चुनाव पाठशाळेच्या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. पाच दिवस चाललेल्या या उपक्रमामध्ये तब्बल तीन लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून प्रत्येक घरात मतदान करण्याचा संदेश पोहोचवला आहे.थोडक्यात ‘मतदार राजा जागो हो, लोकशाहीचा धागा हो!’ हा संदेश या उपक्रमाच्या माझ्यातून जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला.
शिक्षकांच्या सहभागातून हा अभिनव उपक्रम बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात आला असून पाच दिवसाच्या या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाही, संसदीय पद्धती, निवडणूक व मतदान प्रक्रियेविषयी माहिती देऊन त्यांचे उद्बोधन करण्यात आले. त्याचे सकारात्मक परिणाम यंदाच्या लोकसभा निवडणुकीत समोर येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी स्वीप-१, स्वीप-टू असे उपक्रम राबविण्यासोबतच यंदा लोकशाहीची भिंत हा अभिनव उपक्रमही राबविलेला आहे. त्याचेही येत्या काळात सकारात्मक परिणाम समोर येणार आहेत.
विद्यार्थ्यांचे आवाहन महत्त्वाचा टप्पा
दीड हजार शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील मतदानाचा अधिकार प्राप्त व्यक्तीला आपल्या वहीवर संदेश लिहून १८ एप्रिल रोजी न चुकता मतदान करण्याबाबत केलेले आवाहन या निवडणूक पाठशाळेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. त्यातून थेट मतदारांना निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे अपिल या उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचविता आले असल्याचा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी व्यक्त केला.