बुलडाणा : गतवर्षी जिल्ह्यातील दोन लाख ९५ हजार शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा काढला हाेता. अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इतर जिल्ह्यात पीकविम्याची भरपाई मिळत असली तरी बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, मका, कापूस व तूर या सात पिकांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना अधिसूचित आहे. गतवर्षी २०२०-२१ या हंगामात बुलडाणा जिल्ह्यातील दोन लाख ९५ हजार १५७ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घेतला हाेता. दोन लाख २५ हजार ८१० हेक्टर क्षेत्रासाठी हा विमा काढण्यात आला आहे. गतवर्षीच्या खरिपात पेरणीपासून कापणीपर्यंत पाऊस सारखा सुरू होता. उत्पादनात वाढ होऊन उत्पन्न मिळण्याची आशा असताना ऐन काढणीच्या हंगामात सोयाबीनमध्ये शेतात पाणी साचलेले हाेते. यावर्षीच्या आधी सन २०१९- २० मध्ये ६८ टक्के शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला होता. महत्त्वाचे म्हणजे त्यावर्षी दोन लाख ३८ हजार २७८ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी एक लाख ६२ हजार १८३ शेतकऱ्यांना २२३ कोटी २५ लाख रक्कम विम्याच्या मोबदल्यात मिळाली. हा चांगला अनुभव पाहता गतवर्षी सुमारे ४३ हजार शेतकऱ्यांची वाढ पीकविमा योजनेत नोंदवली गेली. मात्र कोरोनाच्या सावटात पुन्हा एकदा नवा हंगाम तोंडावर असताना विम्याची आस शेतकऱ्यांना आहे. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील १४१९ गावांमध्ये अंतिम पैसेवारी ही ५० पैशाच्या आत आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर प्रधानमंत्री पीकविमा योजनेत मदत दिली जाते याचा अहवाल शासनाकडून कंपनीकडे सादर झाला आहे.
शेतकऱ्यांनी भरले १७० काेटी
२०१९- २०च्या खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी)कडे या योजनेचा कारभार होता. १२० कोटी रुपये विम्याचा हप्ता या कंपनीकडे भरण्यात आला होता. त्या तुलनेत एक लाख ६२ हजार १८३ पात्र शेतकऱ्यांना जवळपास २२३ कोटी ४५ लाख रुपये मोबदला शेतकऱ्यांना मिळाला. गतवर्षी २०२०-२१ मध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे काम होते. या कंपनीकडष सहभागी दोन लाख ९५ हजार १५७ शेतकऱ्यांची सुमारे १७० कोटी रुपये हप्ता रक्कम भरण्यात आली आहे. मात्र, अजूनही मदत मिळालेली नाही.
अतिवृष्टीचा खरीप पिकांना फटका
गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील अनेक पिकांना फटका बसला आहे. मूग, साेयाबीन आणि उडीद पीक काढणीला आलेला असताना जाेरदार पाऊस झाला. त्यामुळे, अनेक शेतकऱ्यांना पीक घरी आणता आले नाही. लागवडीचा खर्चही निघाला नसल्याने शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून आस आहे. अनेक शेतकऱ्यांना माेठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे.
विमा भररूनही भरपाईची प्रतीक्षाच
गेल्यावर्षी खरीप पिकांचा विमा काढला हाेता. अतिवृष्टीमुळे खरिपातील सर्वच पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. विम्याचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, अजूनही लाभ मिळाला नाही. खरीप हंगाम सुरू हाेण्यापूर्वी मदत मिळाल्यास हातभार लागेल. विमा कंपनीने तातडीने लाभ द्यावा.
गणेश भाेसले, शेतकरी, नागझरी
काेराेना संसर्गाममुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे साेयाबीन पीक घरीही आणता आले नाही. साेयाबीनचा विमा काढलेला आहे. मात्र, अजूनही भरपाई मिळालेली नाही. खरीप हंगामापूर्वी मदत दिल्यास शेतकऱ्यांना आधार मिळेल.
एकनाथ आव्हाडे, शेतकरी, हिवरा आश्रम
गतवर्षी खरीप हंगामात साेयाबीन, कापूस आणि तुरीचा विमा काढला हाेता. अतिवृष्टीमुळे बहुतांश पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याने भरपाई मिळेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, अजूनही विम्याचा लाभ मिळालेला नाही. खरीप हंगामापूर्वी मदत दिल्यास दिलासा मिळेल.
स्वप्नील घाेडे, शेतकरी, मेहकर