शेतकर्यांना गतवर्षीच्या पीक विम्याची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 01:09 AM2017-08-09T01:09:54+5:302017-08-09T01:11:21+5:30
बुलडाणा/जांभोरा : यावर्षी पीक विमा काढण्याची मुदत संपली असली तरी जिल्ह्यातील शेतकर्यांना गतवर्षी काढलेला पिकांचा विमा अद्याप मिळाला नाही. जिल्ह्यात कोट्यवधीचा पीक विमा मंजूर झाला असला तरी अद्यापही बँकेच्या चकरा माराव्या लागत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/जांभोरा : यावर्षी पीक विमा काढण्याची मुदत संपली असली तरी जिल्ह्यातील शेतकर्यांना गतवर्षी काढलेला पिकांचा विमा अद्याप मिळाला नाही. जिल्ह्यात कोट्यवधीचा पीक विमा मंजूर झाला असला तरी अद्यापही बँकेच्या चकरा माराव्या लागत आहेत.
शासनाच्यावतीने पीक विमा काढण्याचे शेतकर्यांना आवाहन करण्यात येते. त्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा काढतात. सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकर्यांसाठी १७ कोटी ९७ लाख रुपये पीक विम्यासाठी मंजूर झाले आहेत. यामध्ये ३२ हजार ३६५ शेतकर्यांचा समावेश आहे. ही रक्कम आज मिळेल उद्या मिळेल, या आशेने शेतकरी असलेल्या बँकेमध्ये चकरा मारत आहेत; मात्र त्यांच्या नशिबी उपेक्षाच येत आहे. विम्याच्या रकमेतून पीक कर्जाचा भरना करून कर्ज पुनर्गठनासाठी ही रक्कम उपयोगी पडली नाही. शेतीच्या रब्बीच्या हंगामातील पिकासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा कंपनी मार्फत जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील शेतकर्यांनी सन २0१५- १६ चा रब्बी हंगामाची गहू, हरभरा, करडई आदी पिकाचा पीक विमा हप्ता भरलेला होता; मात्र कमी पावसाअभावी पिके करपली. हरभरा पिकांचे बियाण्यांचा खर्चदेखील वसूल झाला नाही. अशा परिस्थितीत रब्बी पीक विम्याचा शेतकर्यांना आधार होता; मात्र अजूनही शेतकर्यांना विमा मिळाला नाही. शेतकरी अजूनही पीक विम्याच्या आशा धरून बसले आहेत. या कुंभकर्णी झोपेतील शासनाला अद्यापही जाग येत नाही. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विमा कंपनीने सर्वच महसूल विभागाचा पीक विमा मंजूर केला होता. गह,ू हरभरा आदी पिकाच्या नुकसानीच्या हेक्टरी रक्कम पाठवून दोन महिने झाले होते; पण शासनाच्या लालफितीत या विमा नुकसान भरपाईची रक्कम बळीराजाच्या खात्यावर जमा झाली नाही.