दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 11:17 AM2020-08-08T11:17:37+5:302020-08-08T11:17:42+5:30
विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आलेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल २९ जुलै रोजी आॅनलाईन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यावर्षी बुलडाणा जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल बुलडाणा ९६.१० टक्के लागला आहे. या परीक्षेस जिल्ह्यातून एकूण ४३ हजार ९२२ विद्यार्थी प्रवेशित झाले होते. त्यापैकी ४३ हजार ६६९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४१ हजार ४१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे, शाळांचे नियोजन विस्कळीत झाले आहे.
जुनमध्ये लागणारा निकाल २९ जुलै रोजी जाहीर करण्यात आला. आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर चार ते पाच दिवसात गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षीत होते. मात्र, आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल दहा दिवसानंतरही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रवेश प्रकीयेस विलंब
जिल्हाभरात आयटीयआयच्या प्रवेशास प्रारंभ झाला आहे. मात्र, गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थी प्रवेश घेउ शकत नसल्याचे चित्र आहे. तसेच जिल्हास्तरावर शिक्षण विभागही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांची प्रतीक्षा करीत असून त्यानंतरच ११वी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. एरव्ही आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनी गुणपत्रिका येत होत्या. मात्र, यावर्षी कोरोनामुळे नियोजन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
दहावी निकाल जाहीर करण्यास दोन महिन्यांचा विलंब झाला होता. महाविद्यालयांनी आॅनलाईन प्रवेश प्रक्रीया सुरू केली असली तरी जो पर्यंत कागदपत्रे सादर करण्यात येत नाहीत, तो पर्यंत विद्यार्थ्यांचा प्रवेश होत नाही. त्यामुळे गुणपत्रिकांची विद्यार्थ्यांना प्रतिक्षा आहे.