लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तालुक्यातील बोथाकाजी व बोरी अडगाव येथील दारूविक्री तात्काळ बंद करण्यात यावी, अन्यथा प्रशासनाने महिला बचत गटाला दारूविक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी मातृशक्तीने सोमवारी निवेदनातून केली आहे.खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव आणि बोथाकाजी येथील महिला बचत गटाने गावात दारू बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. गाव आणि परिसरातील दारू विक्री होत असल्यामुळे महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. दारूमुळे परिसरातील अनेक संसार उध्वस्त झाले असून, अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत असून, गावात तंटे निर्माण होत आहेत. परिणामी, बोथाकाजी आणि बोरी अडगाव येथील दारू विक्रीला आळा घालावा, अन्यथा महिला बचत गटाला दारू विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर बोरी अडगाव येथील सरपंच सौ. सिमा टिकार, अडगाव येथील सरपंच ज्ञानेश्वर मेतकर, खराटे, व.सु. टिकार, दुर्गा टिकार यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षरी आहेत.
अन्यथा आंदोलनाचा इशारा!तालुक्यातील बोरी अडगाव आणि बोथाकाजी येथील दारू विक्रीला तात्काळ बंदी घालावी या मागणीसाठी महिला बचत गटाच्या अनेक महिलांनी सोमवारी उपविभागीय अधिकारी, खामगाव, पोलिस निरिक्षक, ग्रामीण यांच्या मार्फत जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन सादर केले. या निवेदनात परिसरात दारू बंदी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.